महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार; शरद पवार यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीबाबत झालेल्या सर्व्हेमध्ये जनमत इंडिया आघाडीच्या बाजून दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत स्थितीत असून आघाडीलाच जनमताचा चांगला कौल मिळेल, असे सर्व्हेमधून दिसून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लोकसभेबाबत आपले अंदाज व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला 25 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या. यामध्ये आमच्या पक्षाला चार जागा, एक जागा काँग्रेस आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. आता महाविकास आघाडी एकत्र असल्याने यंदाच्या निवडणुकीत आमच्या जागांमध्ये तिप्पटीपेक्षा जास्त जागांची वाढ होईल. राज्यातील 48 जागांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 25 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. तसेच या 25 जागांमध्ये बारामतीची जागा असणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपने देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 प्लसचा नारा दिला आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्न भंगणार असल्याचे सर्व्हेमधून दिसून येत आहे. तसेच शरद पवार यांनीही महाविकास आघाडीला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. जनतेला लोकशाही हवी आहे. त्यामुळे जनता मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.