मराठा आरक्षणासाठी 4 जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार! मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. 4 जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10 टक्के आरक्षण दिले ते कुणाच्याही फायद्याचे नाही. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा 4 जूनपासून उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले.

मनोज जरांगे 4 जून रोजी सकाळी 9 वाजता उपोषण सुरू करणार आहेत. आपल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समाजाला आवाहन करण्याची गरज नाही. समाज माझ्यासोबत आहे, आणि मी समाजासोहत आहे, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा समाज नाही. आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले. कोणाला पाडायचे हे मराठा समाजाला माहिती आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

राज्यामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना माझ्या मागे लागायची काही गरज होती का? देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे. अशा लोकांमुळेच मोदी यांच्यावर प्रचारासाठी वणवण करायची वेळ आली आहे. यामुळेच मोदींना सोलापूर मध्ये तीन सभा घ्याव्या लागल्या, असेही जरांगे म्हणाले. मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. मात्र, विधानसभेसाठी आमची तयारी सुरू आहे. मैदानात मी असणार आहे. सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आरक्षण या आमच्या मागण्या आहेत. त्या मान्य झाल्या तर मी मैदानात उतरणार नाही, राजकारण माझा मार्ग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.