दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला; शुक्रवारी होणार सुनावणी

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. मात्र, न्यायालयाची कामकाजाची वेळ संपल्यामुळे न्यायालयाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. आता उद्या (शुक्रवारी) याबाबतची पुढील सुनावणी होऊन उद्या निकाल येण्याची शक्यता आहे.

दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर महानगर दंडाधिकारी एम. आर. वाशिमकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दत्ता दळवी यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला होता. सरकारी वकिलांकडून जामीनाला विरोध करण्यात आला. दळवी हे जबाबदार नागरिक आणि सिनियर सिटिझन असून ते कायमस्वरूपी मुंबईचे रहिवासी आहेत. त्यामुळे न्यायालयाने अटी शर्तींसह त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी दत्ता दळवींच्या वकिलांनी केली. त्याचप्रमाणे पोलीसांना सर्व प्रकारे सहकार्य करू, बंधनं पाळू अशी ग्वाहीदेखील दत्ता दळवींच्या वकिलांकडून देण्यात आली होती. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालय जामीन अर्जावर निकाल देणार होते. मात्र, न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आता यावर उद्या सुनावणी होणार यावर निकाल येण्याची शक्यता आहे.