राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मनोज जरांगे यांनी आता लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्या हा मुद्दा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. आगामी निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी ओबीसींना केले आहे. त्या वक्तव्यावर आता जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मराठ्यांना ओबीसीमधून आधीच 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे. मनोज जरांगे यांनी आता अल्टिमेटम सरकारला दिला आहे. सरकारने त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. गरीब मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांनी आम्हाला सत्ता द्यावी. त्यांना आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचं ताट कसं वेगळं ठेवायचं याचा फार्मूला आमच्याकडे आहे. सत्ता मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हा फार्मूला सांगणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांना काहीही म्हणू द्या, आपली हरकत नाही, मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे. त्यांना याआधी उत्तर कधी दिले नाही आणि यापुढे देखील देणार नाही. ते आता नवीन काय काढायला लागले आहेत. त्यांचे आम्हाला काहीच कळत नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच ज्यांना निवडणूक लढवयाची त्यांनी कागदपत्राची तयारी ठेवा. आतापासूनच कागदपत्र काढून ठेवा. सगळ्यांनी ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहायचे असे त्यांनी म्हटले आहे.
…तर लय फजिती होईल
मनोज जरांगेंचा मराठवाड्यात जाऊन आपण समाचार घेणार असल्याचे नारायण राणेंनी म्हटले होते. त्यावर जरांगे म्हणाले की, मी त्यांना कधी म्हणलो येऊ नका. हे मला बघून घेणार म्हणतात ही कोणती धमकी आहे, मला तुम्ही काय बघणार आहे. मला पोकळ धमकी देता का? मी बघायला लागल्यावर लय फजिती होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.