मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजपचे 400 पारचे फक्तपोकळ दावे; संजय राऊत यांचा निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला भाजपसोबत कधीही जायचे नव्हते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शब्दाला पक्के आहेत. त्यामुळे सुनील तटकरे यांनी शिवसेना भाजपसोबत जाणार होती, या दाव्यातील हवाच काढून टाकली. तसेच जे पक्ष फोडून बाहेर पडले, त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा, असा टोलाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. एबीपी माझाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल, तसेच भाजपचे 400 पारचे दावे पोकळ आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा मिळवणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिंदे, आणि अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. मिंधे आणि अजित पवार बुडबुडे आहेत, त्यामुळे भाजपच्या राज्यात 45 प्लस आणि देशात 400 जागा येणार नाहीत, असेही ते म्हणाले. इंडिया आघाडीला 300 जागा मिळतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

मोदी शाह यांनी ठरवले तर ते कोणालाही तुरुंगात टाकू शकतात. सत्ता कायमची नाही, तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे. मोदी शाह खोटारडे, त्यांनी देशाला तेच धडे दिले. आता त्यांनी जे पेरले तेच उगवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुखमंत्री असते. 2019 मध्ये भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात खेळ खंडोबा केलाय, असेही ते म्हणाले.