दिल्ली आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणार, ही काळ्या दगडावरची रेष; जयंत पाटील यांचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता अनेक सर्वेक्षण आले आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीलाच जनतेचा कौल असल्याचे दिसून आले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील आणि लोकसभा निवडणुकीनंतर काय बदल दिसतील, याबाबत महत्त्वाचा दावा केला आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत. त्यापैकी 7 जागा आम्ही जिंकू, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आणि देशात मोठे राजकीय बदल होणार आहेत. महायुतीत असणारे भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्याकडील 12 ते 15 जणांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत येण्याचा शब्द दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही सर्व मंडळी शरद पवार यांच्या पक्षात येतील, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. पक्षात येणारे नेमके कोण आहेत, ते सांगून आपण त्यांना अडचणीत आणणार नाही. थोडे दिवस जाऊ द्या, दिल्लीत सत्तांतर होणार आणि महाराष्ट्रातही सत्तांतर होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार आणि अमित शाह यांची एका बड्या उद्योगपतीच्या घरी बैठक झाल्याबाबत विचारले असता शरद पवार यांच्याबाबत गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न सुरु असून ते अंगाला तेल लावलेले पैलवान आहेत , कोणाच्या हाताला लागत नाहीत, असेही ते म्हणाले. आशिष शेलार यांनी बोलताना घाईघाईत सुनेत्रा पवार पराभूत होतील असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना ही स्लिप ऑफ टंग नाही तर शेलार यांची तशी अंतर्गत माहिती असेल, त्यामुळे ते चुकून बोलले नसतील, असा चिमटाही त्यांनी काढला. आता अजितदादा तिकडे गेले आहेत, त्यामुळे त्यांचे तिथे कोणकोण हितशत्रू आहेत, याचा अनुभव त्यांना आता आला असेल, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.