नितीन गडकरी गेले कुणीकडे? महायुतीच्या सभेला अनुपस्थित असल्याने सोशल मिडीयावर चर्चेला उधाण

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार थंडावला असून सोमवारी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालांबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. यंदा भाजपसमोर इंडिया आघाडीचे तगडे आव्हान आहे. त्यासाठीच भाजपने अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना वॉशिंग मशीनमधून स्वच्छ करून पक्षात घेतले. आम्ही आता सक्षम असून आमच्या पद्धतीने पक्ष वाढवत आहोत आणि आधी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती, आता आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे विधान भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नुकतेच केले आणि पुन्हा एकदा भाजप आरएसएस संबंधांची चर्चा सोशल मिडीयावर सुरू झाली. या चर्चेत आणखी एक मुद्दा म्हणजे गेले नितीन गडकरी कोणीकडे, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईतील शिवतीर्थावर महायुतीची गाजावाजा केलेली सभा नुकतीच झाली. जनतेने या सभेकडे पाठ फिरवल्याने महायुतीच्या नेत्यांची चांगलीच फजिती झाली. तसेच या सभेत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यांच्या या सभेतील अनुपस्थितीबाबत सोशल मिडीयवर चर्चा सुरू आहेत. नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. आपल्या पक्ष आणि धोरणांविरोधातील मतेही त्यांनी परखडपणे मांडली आहेत. त्यामुळे भाजपश्रेष्ठी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याचीही राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती.

गडकरी नागपूरचे असल्याने त्यांचे आणि संघांचे जवळेचे संबंध आहेत. तसेच 2019 मध्ये संघाकडून नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी होत होती. मात्र, पुलवामा आणि इतर राजकीय घडामोडींमुळे पंतप्रधानपद पुन्हा एकदा मोदींना मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर गडकरी यांना डावलण्याचे प्रकार घडले. अनेकदा गडकरी यांनी पक्ष आणि धोरणांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेरही दिला आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत संघाकडून त्यांचे नाव घेतले जात असल्याने भाजपश्रेष्ठींची अस्वस्थता वाढत होती. त्यातूनच गडकरी यांना डावलण्यात येत असल्याची सोशल मिडीयावर चर्चा होती.

त्यातच आता लोकसभा निवडणुक प्रचारासाठी महायुतीच्या नेत्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, जनतेप्रमाणे गडकरी यांनीही सभेकडे पाठ फिरवली आणि सोशल मिडायावर चर्चेला सुरूवात झाली. भाजपचा दिल्लीतील आवाज आणि क्रमांक दोनचे नेते नितीन गडकरींची अनुपस्थिती या सभेत प्रकर्षाने जाणवली. मोदी आणि गडकरींचे सूत जुळत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. 2019 नंतर गडकरी आणि मोदी अपवादानेच एकत्र दिसले. ज्येष्ठ, अनुभवी आणि कामाचा धडाका असलेले मंत्री असूनही राष्ट्रीय राजकारणात गडकरींना डावलण्यात आले.

आता पक्षाध्यक्ष नड्डा यांनीही अप्रत्यक्षपणे आता आम्हाला संघाची गरज नसल्याचे वक्तव्य केले. तसेच पुन्हा सत्तेत येण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचले. त्यासाठी प्रलोभने, दबावतंत्र आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. अशा बऱ्याच गोष्टी संघालाही रचत नव्हत्या. मात्र, त्याची चर्चा झाली नाही. आता मात्र सोशल मिडीयावर याची चर्चा होत आहे. पंतप्रधानपदासाठी कायम नाव घेतले जाणारे गडकरी महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत उपस्थित नव्हते, हे बरेच काही सांगते, असे मतही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील गडकरींसारखा ज्येष्ठ आणि अनुभवी नेता आपल्याच पक्षाच्या मोठ्या सभेमध्ये गैरहजर राहतो, याची चर्चा होत आहे.

पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मित्रपक्ष जमवणे आणि बहुमताचा आकडा गाठणे, हे मोदी- शहा यांच्यासाठी कठीण दिसत आहे. यंदाही संघाकडून गडकरींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदासाठी गडकरी हे संघाची पहिली पसंती आहे, अशा चर्चा वेळोवेळी होत असतात. याआधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची पंत्रप्रधानपदाची संधी थोडक्यात निसटली होती. त्यानंतर शरद पवारांचे नाव पंतप्रधानपदासासाठी घेतले जात होते. आता या पदासाठी गडकरी यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, आता भाजप संघ संबंध आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तोपर्यंत सोशल मिडीयावर राजकीय चर्चा होतच राहणार आहेत. मात्र, सध्या महायुतीच्या सभेतील गडकरी यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरत आहे.