
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मुंबईत 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात एकता दौड आयोजित केली आहे. मुंबईत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता मरीन ड्राइव्ह येथून दौड सुरू होईल.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येईल. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होतील. राज्याच्या इतरही जिह्यांमध्ये दौडसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुंबईत अशी होईल दौड
मुंबईतील एकता दौड 8 वाजता मरीन ड्राइव्ह येथील एनसीपीए गेट क्रमांक 3 पासून सुरू होईल आणि ग्रॅण्ड मेडिकल कॉलेजला संपेल. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात येईल.




























































