राज्यात 1320 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 200 साखर कारखान्यांनी 1320.31 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1372.78 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 10.40 टक्के आहे. यंदाचा हंगाम 173 दिवस चालला आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांकडून 1 कोटी 83 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

यंदा राज्यात मोठय़ा प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. उसाचं क्षेत्र वाढल्याने यावर्षी राज्यात विक्रमी गाळप होण्याची शक्यता आहे. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱयांचा ऊस शेतातच असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात अद्याप 30 ते 33 लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप शिल्लक राहिले आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. जिल्ह्याच्या उत्तर भागात राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या तीन तालुक्यांत उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदा जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला. श्रीरामपूर तालुक्यात 80 हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कमी- अधिक प्रमाणात इतरही तालुक्यांतही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी ही शेजारील कारखान्यांवर विभागून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नगर जिल्ह्यात 1 कोटी 83 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण

नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 9 खासगी अशा एकूण 23 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम 2021-22 अखेर 1 कोटी 85 लाख 17 हजार 909 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 85 लाख 25 हजार 518 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 10.10 टक्के आहे. नगर जिल्ह्यातील एकूण 1 कोटी 85 लाख 17 हजार 909 मेट्रिक टन उसापैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी 1 कोटी 26 लाख 85 हजार 183 मेट्रिक टन, तर 9 खासगी साखर कारखान्यांनी 58 लाख 32 हजार 726 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

विभागनिहाय गाळप

(गाळप लाख मे. टन, साखर लाख क्विंटल याप्रमाणे)

विभाग       कारखाने       गाळप        साखर उत्पादन     उतारा टक्के
कोल्हापूर      36           254.69       300.41           11.80
पुणे            30           269.87       291.29           10.79
सोलापूर       47           300.68       284.34             9.46
नगर           28           200.54       200.72           10.01
संभाजीनगर   25           132.83       129.27             9.73
नांदेड         27            147.12      153.26            10.42
अमरावती      3              10.03         9.67              9.64
नागपूर         4                4.55         3.82              8.40
एकूण       200           1320.31    1372.78           10.40

उच्चतम गाळप केलेले राज्यातील 10 कारखाने

विठ्ठलराव शिंदे (माढा)- 478922 मे. टन, जरंडेश्वर (सातारा)- 1998330 मे. टन, अंबालिका- 1951160 मे. टन, जवाहर हुपरी – 1907298 मे. टन, बारामती ऍग्रो – 1731060 मे. टन, श्री ज्ञानेश्वर – 1659470 मे. टन, संगमनेर – 1532360 मे. टन, माळेगाव – 1526916 मे. टन, मुळा – 1521220 मे. टन, गंगामाई – 1404177 मे. टन.