विधान परिषद निवडणूक होणार! दहा जागा, उमेदवार अकरा… कोणाचे वाजणार बारा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधिमंडळात विधान परिषद निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. अखेरच्या दिवशी भाजपपुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी अन्य कोणत्याही उमेदवाराचा अर्ज मागे न घेतल्याने 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ झाली असून गुप्त मतदानाने होणाऱया या निवडणुकीत 10व्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र असे असले तरी नेमके कोणाचे 12 वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला 26 ते 27 मते आवश्यक आहेत. हे लक्षात घेता भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर कॉंग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो.

विधानसभेतील बलाबल    –  285 आमदार
विजयासाठी मतांचा कोटा    – 27
शिवसेनेची मते – 55     उमेदवार – 2       अतिरिक्त मत 1
राष्ट्रवादीची मते – 53     उमेदवार – 2       1 मताची गरज
काँग्रेसची मते – 44       उमेदवार – 2       10 मतांची गरज
भाजपची मते – 106      उमेदवार – 5      29 मतांची गरज

अपक्ष व इतर लहान पक्षांची मते 29

हंडोरे, खडसे अडचणीत

राज्यसभा निवडणुकीत भाजपने आमदारांना आपलेसे केल्याने आघाडीतील एक उमेदवार अडचणीत असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत धनशक्तीचा प्रभाव राहणार असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसचे भाई जगताप हे विधान परिषद निवडणूक लढविण्यात माहीर आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांची भिस्त पक्षाच्या आमदारांवर आणि नेत्यांवर आहे.

राज्यपाल नियुक्त कोटय़ातील उमेदवारी रखडल्याने राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला खडसे वरच्या सभागृहात हवे आहेत. मात्र फडणवीस आणि खडसे यांचा राजकीय संघर्ष लक्षात घेता भाजपकडून खडसे यांना रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो.