साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता संपविणार? डॉ. सदानंद मोरे यांचा राजीनामा

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्वायत्तता संपवण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागातील काही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यासाठी मंडळाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात असून, मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. याविरोधात मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा दिल्याचेही समजते.

‘मंडळ’ हे नामाभिधान बदलून त्याचे ‘साहित्य संचालनालय’ असे नामकरण करण्याचा मानस असल्याचे समजते. मंडळाचे रूपांतर सरकारी खात्यात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय मंडळाची संरचना बदलण्याचे, उद्दिष्टे बदलण्याचे प्रयत्न काही अधिकारी करत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मंडळाच्या अध्यक्षांसह सदस्यांची याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाबाबत चर्चा झाली. साहित्य आणि संस्कृती मंडळ हे आर्थिकदृष्ट्या स्वायत्त नसले तरी अन्य बाबतीत स्वायत्त आहे. मात्र, या हस्तक्षेपामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली मंडळाची परंपरा धोक्यात येत आहे. अशी भूमिका सदस्यांनी मांडली. त्यामुळे मंडळाची स्वायत्तता संपवण्याच्या या प्रयत्नांविरोधातील ठराव बैठकीत करण्यात आला. हा ठराव राज्याचे मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.