एसटीच्या ताफ्यात आठवडाभरात येणार नॉन एसी स्लीपर बस

सर्वसामान्यांसाठी गावखेडय़ापर्यंत धावणाऱया एसटीची वाटचाल आता आरामदायी प्रवासाच्या दिशेने सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीने आता आठवडाभरात नॉन एसी स्लीपर बस येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनाही आता आरामात झोपून प्रवास करता येणार आहे. एसटीच्या ताफ्यात जवळपास साडेतेरा हजार बस असल्या तरी त्यापैकी अनेक गाडय़ांची दुरवस्था झाली आहे. त्याची दखल घेतल एसटी टप्प्याटप्प्याने आपल्या ताफ्यात नवीन गाडय़ा आणत आहे. त्याचाच भाग म्हणून ऑक्टोबर अखेरपर्यंत 50 नॉन एसी स्लीपर बस आपल्या ताफ्यात आणणार आहेत. त्यापैकी पहिली गाडी लवकरच येणार असल्याची माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. 30 प्रवाशांना या गाडीने प्रवास करता येणार आहे. सदरच्या गाडय़ा एसटीच्या दापोडी कार्यशाळेत बांधण्याचे काम सुरू असून त्यापैकी पहिली गाडी तयार झाली आहे. मुंबई-कोल्हापूर, मुंबई-संभाजीनगर, पुणे-नागपूर या मार्गावर सदरच्या गाडय़ा चालवल्या जाणार आहेत.