
भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन एसटी बसेससाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17 हजार 450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30 हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे होतकरू तरुण-तरुणींनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बस सेवा पुरविणे शक्य होणार आहे.