Unlock Lockdown – राज्याच्या टास्क फोर्सचा सावध पवित्रा, मार्चनंतरच 100 टक्के अनलॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यभरात डिसेंबरअखेर सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण आटोक्यात आली आहे. मात्र अजूनही दररोज शेकडो रुग्ण आढळत असल्यामुळे पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणाची ही स्थिती कायम राहिल्यास मार्चअखेरनंतरच 100 टक्के ‘अनलॉक’चा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याच्या ‘टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱया लाटेत सर्वाधिक वेगाने पसरणाऱया ओमायक्रोनमुळे मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजारांपार नोंद होऊ लागल्याने पालिकेसह राज्य सरकारचेही टेन्शन वाढले होते. मात्र दोन लाटांपेक्षा तिसऱया लाटेतील कोरोना व्हेरिएंटच्या कमी घातकतेमुळे महिनाभरातच कोरोना नियंत्रणात आला. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटन स्थळे, चौपाटय़ा, उद्याने-मैदाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. मात्र अजूनही दररोज शेकडो रुग्ण आढळत असल्यामुळे मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृहे, नाटय़गृहे, नियमित वेळेनुसार मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, मुंबईत दररोज 30 ते 40 हजार चाचण्या होत असताना 200 ते 250 कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे मुंबई 100 टक्के अनलॉक होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र घाई न करता अजून काही दिवस खबरदारी घेतली पाहिजे आणि कोरोना असाच नियंत्रणात राहिला तर 100 टक्के अनलॉक करता येईल अशी भूमिका राज्याच्या ‘कोरोना टास्क फोर्स’ने घेतली आहे.

कोरोना रोखण्यामध्ये मास्क महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम मोडल्यास 200 रुपयांचा दंड केला जात आहे.

मास्क राहणारच

मुंबईत सद्यस्थितीत रुग्णसंख्या आणि मृत्यू घटले असले तरी ‘मास्क’मुक्तीची वेळ अजूनही आलेली नाही. मार्चअखेरपर्यंतची स्थिती पाहूनच मास्कमुक्तीचा निर्णय घेता येईल.

…म्हणूनच टास्क फोर्स सावध

कोरोनानंतर डेल्टा, ओमायक्रोनसोबतच आता ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवा व्हेरिएंट आढळला आहे. आगामी काळत कोरोनाचे आणखी काही व्हेरिएंट येण्याची शक्यता आरोग्यतज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच कोरोनाच्या पूर्ण नियंत्रणापर्यंत राज्याची टास्क फोर्स सावध आहे.

लसीकरणाचा वेग वाढवा

12 कोटी लोकसंख्या असेल्या महाराष्ट्रात पात्र लाभार्थ्यांपैकी 6 कोटी 50 लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर मुंबईत पात्र लाभार्थ्यांपैकी 97 टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोना रोखण्यात लसीकरण सर्वोत्तम असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवून लवकरात लवकर 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश टास्क फोर्सकडून देण्यात आले आहेत.