गुटखा उत्पादक, विक्रेत्यांना मकोका लावणार

गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांची नवीन वर्षात खैर नाही. गुटखाबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

राज्यात गुटखाबंदी असतानाही शाळा परिसर, पानवाल्यांच्या ठेल्यामधून चोरीछुपे गुटखा विक्री होते. पान-तंबाखूच्या गाद्यांवरही गुटखा विक्री केली जाते अशा तक्रारी आहेत. यापूर्वी गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता, मात्र कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱयांवरही ‘मकोका’ लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन दिली होती.