पंढरपूर, कर्जतला अवकाळी पावसाने झोडपले

पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱया दिवशी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होता. या पावसामुळे द्राक्ष व डाळिंब बागायतदार हवालदिल झाले असून, मळणीस आलेला मकापिके मोठय़ा प्रमाणावर भिजली, तर ऊसतोडी खोळंबल्यामुळे कारखान्यांच्या गाळपावर मोठा परिणाम झाला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब, पट कुरोली, भंडीशेगाव, पंढरपूर, तुंगत या गावांना मोठा फटका बसला. या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्षघडात पाणी गेल्याने फळगळतीचा धोका वाढला असून, भुरी, दावण्या या रोगांचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर, डाळिंबबागांवर तेल्या, मर, कुजवा आदी रोग वाढत आहेत. तर, काढणीस आलेला मका भिजल्यामुळे त्याची मळणी कशी करायची? हा प्रश्न शेतकऱयांपुढे उभा राहिला आहे.

दरम्यान, तालुक्यात साखर कारखान्याचा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. मात्र, सलग दोन दिवस अवकाळी पावसाने ऊसतोडणीवर परिणाम झाला आहे. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने उसाच्या फडापर्यंत न जाता अडकून पडत आहेत. त्यामुळे ऊसतोडणी मंदावल्या असून, काखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे.

पंढरपूर तालुक्यात आज झालेला पाऊस (मि.मी.)

ह करकंब -14, पट कुरोली -15, भंडीशेगाव – 17, भाळवणी – 7, कासेगाव – 9, पंढरपूर – 23, तुंगत – 11, चळे – 4.2, पुळूज – 10. एकूण पाऊस – 110.2 मि.मी.

कर्जत तालुक्यात रब्बी पिके भुईसपाट

कर्जत शहर व तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दुष्काळाच्या छायेत वावरणाऱया शेतकऱयांचे या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. मका, ज्वारी पिके भुईसपाट झाली. तर, द्राक्षबागांवर दावण्या, भुरी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष कर्जत-जामखेड व नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या वतीने पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे कर्जत तहसीदारांकडे केली.