राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम; जलस्त्रोतांची दुरुस्ती, 1 हजार 340 कोटी खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून जलस्रोतांची दुरुस्ती व सिंचन क्षमता वाढवण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. 1 हजार 340 कोटी 75 लाख रुपये खर्च करून ही योजना एप्रिल 2020 ते मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात येईल.

मागील 30 ते 40 वर्षात दुष्काळ निवारणासाठी रोजगार हमी योजना व इतर योजनांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जलस्रोतांची निर्मिती करण्यात आली. परंतु या जलस्रोतांची नियमित देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करता येत नाही. अशा पूर्ण झालेल्या योजनांपैकी 7 हजार 916 योजनांची विशेष दुरुस्ती करून जलसाठा व सिंचन क्षमता वाढवण्यात येईल. या योजनांचे पुनरुज्जीवन केल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल.

बंधारे, तलाव दुरुस्त करणार

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेच्या मर्यादेतील पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, लघु पाटबंधारे तलाव, साठवण बंधारे, कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे, माजी मालगुजारी तलाव, सिमेंट नाला बांध, माती नालाबांध, वळवणीचे बंधाऱयांची जलस्रोतांची दुरुस्ती करून सिंचन क्षमता कायम ठेवण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

कालव्याच्या भरावाची व कालव्यावरील बांधकामे नादुरुस्त झाल्याने कालव्यातील पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जाते. त्यामुळे या कालव्यांच्या दुरुस्तीचीही कामे घेण्यात येतील.

तुकाई उपसा सिंचन योजनेतील पाणी वापर

नगर जिह्यातील कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेच्या पाणी वापराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आता या योजनेत 24 पाझर तलाव व तीन लघुपाटबंधारे तलावांमध्ये पाणी सोडून त्या नंतर या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यात येईल. या योजनेसाठी 5 कोटी 79 लाख 87 हजार रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली.