
कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर या काळात मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
हिवाळी अधिवेशनाचे एक आठवडय़ाचे कामकाज आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजाच्या संदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 24 डिसेंबर रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मागील वर्षीही कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेता आले नव्हते.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरला होणार असल्याचे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची तारीख आणि कालावधी निश्चित करण्यासाठी विधान भवनात बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब हे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी पुढील काही दिवस विमान प्रवास करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना या अधिवेशनात उपस्थित राहायचे आहे. त्यामुळे अधिवेशन मुंबईत घेण्याचे ठरले आहे. मात्र आगामी अधिवेशनापैकी कोणते अधिवेशन नागपूरला घ्यायचे याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
पुढील अधिवेशन नागपुरात?
सलग दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपूरला झालेले नाही. त्यामुळे विदर्भात प्रचंड रोष आहे. सध्या मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने अधिवेशन मुंबईत घ्यावे लागते आहे. तथापि अर्थसंकल्पीय म्हणजे मार्च अधिवेशन नागपूरला घ्यावे, अशी मागणी आम्ही बैठकीत केली आणि त्यावर निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


























































