राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य 15 दिवसांची मुदत संपली, आता आघाडी निर्णय घेईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या नावांना पंधरा दिवसात मंजुरी देण्याची विनंती महाआघाडीच्यावतीने राज्यपालांना केली होती. पण ही मुदत संपुष्टात आली. आता यावर पुढील पावले काय उचलायची याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा जणांच्या नावांच्या यादीला येत्या 21 नोव्हेंबरपर्यंत मंजुरी द्यावी अशी विनंती महाविकास आघाडीच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत संपुष्टात आली.

याबाबत पत्रकारांनी अॅड. अनिल परब यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, या प्रस्तावावर पंधरा दिवसात निर्णय घेण्याची विनंती राज्यपालांना केली होती. ती मुदत आता उलटून गेली आहे. पण कायद्यानुसार राज्यपालांवर मुदतीत निर्णय घेण्याचे बंधन नाही. त्यामुळे पुढील निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील.

या बारा जणांमध्ये काँग्रेसच्या रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुध्द वनकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे तर शिवसेनेच्यावतीने उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर व नितीन बानगुडे पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.