सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यातील औद्योगिक वसाहतीत आता महिन्यातून एक दिवस विजेचा मेगाब्लॉक राहणार आहे. औद्योगिक ग्राहकांना तांत्रिक बिघाडामुळे बत्ती गुलचा सामना करावा लागू नये म्हणून महावितरणने कंबर कसली आहे. त्यानुसार उद्योगांना वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या, वीज उपकेंद्रांमधील सर्व तांत्रिक कामे खबरदारीचा उपाय म्हणून बिघाड होण्याआधी महिन्यातून एकदा केली जाणार आहेत. त्यासाठी पूर्ण दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असला तरी पुढे महिनाभर मात्र ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्याचे कोणतेही टेन्शन राहणार नाही.
महावितरणचे राज्यात 2 कोटी 40 लाख वीज ग्राहक असले तरी महसुलाचा खरा मार्ग औद्योगिक ग्राहक असून त्यांची एकूण संख्या 4 लाख 20 हजारांच्या घरात आहे. महावितरणला मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी सुमारे 60-65 टक्के महसूल औद्योगिक ग्राहकांकडून मिळतो. त्या पार्श्वभूमीवर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी कोकण, पुणे, बारामती, सोलापूर, सांगली, मालेगाव, नाशिक, जळगाव परिसरातील औद्योगिक ग्राहकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच यापुढे ग्राहकांना वारंवार वीज खंडित होण्याचा सामना करावा लागू नये म्हणून लाइनची दुरुस्ती, लूज कंडक्टर टाइट करणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल भरणे, झाडांच्या फांद्या छाटणे, केबल टाकणे आदी कामांसाठी वारंवार वीजपुरवठा खंडित करावा लागतो. तसेच सदर कामे वेळेत न झाल्याने तांत्रिक बिघाड औद्योगिक ग्राहकांना बत्ती गुलचा सामना करावा लागतो. त्यासाठी महिन्यातून एक दिवस सर्व कामे येणार असल्याचे संजीवकुमार यांनी स्पष्ट केले.
आता जनरेटरची गरज लागणार नाही
तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून अनेक औद्योगिक ग्राहक जनरेटर ठेवतात, मात्र यापुढे महिन्यातून एकदाच वीजपुरवठा बंद राहील त्या काळात सर्व कामे केली जाणार असल्याने त्यानंतर वारंवार वीज जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांना जनरेटरची गरज लागणार नसल्याची ग्वाही संजीवकुमार यांनी दिली.




























































