
अबब… महावितरणच्या तब्बल 80 लाख 32 हजार वीज ग्राहकांनी गेल्या दहा महिन्यांत वीज बिलापोटी फुटकी कवडीही भरली नसल्याचे समोर आले आहे. थकीत वीज बिल भरण्यासाठी महावितरण ग्राहकांना वारंवार विनवणी करत आहे.
वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या असल्या तरी त्याचा ग्राहकांवर मात्र कोणताच परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महावितरणच्या एपूण वीज बिल थकबाकीचा आकडा तब्बल 71 हजार कोटींवर पोहचला असून यामध्ये 45 हजार कोटींची मूळ थकबाकी आणि 26 हजार कोटी रुपये व्याज आणि दंडाची रक्कम आहे.
महावितरणचे राज्यात जवळपास अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यामध्ये 1 कोटी 83 लाख घरगुती तर 45 लाख कृषिपंपधारक आहेत. उर्वरित औद्योगिक, वाणिज्यिक गटातील ग्राहक आहेत. कोरोना महामारीच्या काळात आलेले आर्थिक संकट आणि महावितरणने वाढीव वीज बिले पाठवल्याचे कारण देत ग्राहक वीज बिल भरण्याचे टाळत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर महावितरणन तीन टप्प्यांत वीज बिल भरणे, वीज बिलातील व्याजाच्या रकमेत सवलत जाहीर केली आहे. तरीही गेल्या एप्रिलपासून आजपर्यंत जवळपास 38 लाख 21 हजार घरगुती वीज ग्राहकांना आपल्या वीज बिलापेटी एक रुपयाही भरलेला नाही. तसेच वीज बिल न भरणाऱयांमध्ये साडेतीन लाख वाणिज्यिक तर 52 हजार औद्योगिक ग्राहकांनीही वीज बिलाची फुटकी कवडीही भरलेली नाही. तसेच जवळपास 40 लाख कृषिपंपधारकांनीही आपले बिल भरलेले नाही. त्यामुळेच महावितरणच्या वीज बिल थकबाकीचा डोंगर 71 हजार कोटींवर पोहोचला आहे.





























































