महायुतीच्या 240 ते 245 जागा येतील , रामदास आठवलेंचा विश्वास

ramdas-athawale

महायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन झाले आहे. त्यामुळेच रिपब्लीकन पक्ष आज सत्तेत राहू शकला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपा महायुतीच्या किमान 240 ते 245 जागा निवडून येतील, असा विश्वास रिपाइं अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजप-सेनेच्या भवितव्यावर रिपाइंच भवितव्य अबलंबून आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेत आले तर आम्हाला निश्चित सत्तेचा वाटा मिळेल. विधानसभा निवडणुकीत रिपाइंला किमान 10 जागा मिळाव्या, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु काही तडजोडीनंतर आपल्याला पाच जागांवर समाधान मानावे लागल्याचे आठवले म्हणाले. रासप नेते महादेव जानकर यांची नाराजी स्वाभाविक आहे. त्यांना कमळ निशाणी नको होती, पण त्यांचे उमेदवार दुसर्‍या चिन्हावर लढायला तयार नव्हते, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत रिपाइंला योग्य वाटा मिळावा. एक कॅबीनेट व एक राज्यमंत्रीपद मिळावे. तसेच चार महामंडळांचे अध्यक्षपद आणि प्रत्येक महामंडळात रिपाइंला प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी हा पक्ष समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवणारा आहे. आज  राज्यात प्रभावी विरोधक नाही. निवडणूका म्हटल्या की पक्षापुढे अडचणी असतात, अशावेळी कुणाला न्याय मिळतो तर कुणावर अन्याय होतो असे आठवले  म्हणाले.

उद्धव ठाकरे प्रभावी मित्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे प्रभावी मित्र आहेत. तर प्रकाश आंबेडकर हे आपले विरोधक आहेत, असे आठवले म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या