कवडसे – नवी पालवी नवा ऋतू…

>> महेंद्र पाटील

ऋतू येतात आणि जातात. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो. कधी सुख देतो, तर कधी दुःख. काही आठवणी देतो, तर काही साठवणी. काही ऋतूंची आपण मनापासून वाट पाहत असतो, तर काही ऋतू कधी सरतील? असा प्रश्न मनाला पडतो. असाच घोळ माझ्याही मनात सुरू असतो. माझ्या मनातल्या ऋतुपात फक्त दोन ऋतू येतात. एक सुखाचा आणि दुसरा दुःखाचा. सुखद आठवणी घेऊन येणारा ऋतू आपलासा वाटतो, पण त्याहीपेक्षा जास्त जिव्हाळ्याचा असतो तो दुसरा ऋतू. हा दुःखाच्या आठवणी घेऊन येणारा असला तरी हवाहवासा वाटतो. खूप विचित्र समीकरण आहे, पण हे असंच अविरत सुरू असतं. माझ्या मनात गेले कित्येक दिवस या दोघांशिवाय कुणी फिरकलं नाही. या दोघांचंही स्वागत मी मनापासून करतो. कारण त्यांनीच मला जगायला शिकवलं. आठवणींच्या आधारावर दिवस रेटत राहण्यातही काय गंमत असते, हे माझ्या मनाला चांगलंच उमगलं आहे म्हणून माझं मन सलत्या आठवणी उराशी घेऊन जगत होतं. त्या आठवणींपुढे त्याला सुखाचे क्षणसुद्धा नकोसे वाटायचे. फक्त त्याच आठवणींमध्ये ते रमायचं आणि मग बरसू लागायचा ऋतू मनातल्या असंख्य गुदमरलेल्या आठवणींचा.

एकेक क्षण मनाला साद घालून जायचे. जाताना एक सत्य सोडून जायचे. तेच सत्य जपत मी जगायचो. त्यांनाही मग माझा लळा लागायचा. असं करत प्रत्येक दुःखाच्या आठवणी गर्दी करून भोवती जमायच्या तेव्हा मनाला चाहूल लागायची सुखाच्या ऋतूची. पुन्हा ओढ, ध्यास अशा पल्लवित व्हायच्या आणि साद घालायच्या सुखाला. जशी कोकीळ साद घालत वसंताची वाट पाहते अगदी तशीच. सलणाऱया आठवणींच्या गर्दीत हरवलेले सुखांचे क्षण पुन्हा यायचे मनाच्या दारावर टकटक करायला आणि जाणीव व्हायची ऋतूच्या आगमनाची, पण माझ्या हट्टी मनाने जुन्या आठवणी इतक्या कवटाळून ठेवलेल्या असायच्या की, नव्या ऋतूलाही प्रश्न पडायचा. खरंच, माझी हीच का वेळ येण्याची? पण मग त्या आठवणींनाच वाटायचं कुठेतरी, का उगीच आपण सावल्यांच्या पाठी धावायला लागलोय?

नंतर हळूहळू त्याच अलगदपणे माझ्या मनाचा कोपरा रिता करून जायच्या आणि रिकाम्या जागेत हळूहळू नवा ऋतू आकार घेऊ लागायचा. तो आला की, मनाला उगाच परक्यासारखं वाटत रहायचं. कारण सुखांशी मैत्री करायला माझं मन जरा नाराज असायचं. सुख हे एका वाऱयाच्या झुळकीसारखं असतं, पटकन घेऊन निसटून जावं इतकं क्षणभंगुर असतं हे त्या मनाला पक्कं ठाऊक होतं. मग बिचारा ऋतूच मनाला हसवत, खेळवत रहायचा. जुन्या आठवणींना पुसत हळूहळू मन रमायचं नव्या पालवीत. नव्या उमेदीची, हवीहवीशी वाटणारी सुखद पालवी बहरू लागायची, ज्याचा हेवा सर्वांना वाटतो आणि असाच सुखाचा ऋतू कायम मनात असावा हेच सर्वांना हवं असतं. त्याला अपवाद माझ्या मनाचा. कारण त्याने सुख कधी बघितलंच नाही. त्यामुळे दुःखाशी त्याची नाळ अधिकच घट्ट होत गेली. ऋतूमागून ऋतू बदलत गेले, पण माझ्या मनात तोच जुना ऋतू नव्याने येतो. नव्या आठवणींना सोबत घेऊन मला खूप दूर घेऊन जातो. जुन्याच आठवणी पुन्हा नव्याने आठवत कल्पनेच्या रूपात तोच सुखाचं रूप घेऊन येतो. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू असतात तसंच माझ्याही मनात हे दोन ऋतू येत-जात असतात आणि दरवेळी मनाला वाटत राहतं की, आत्ता येईल नवा ऋतू अन् फुटेल नवी पालवी…

[email protected]