मरण सन्मानाने

‘आम्ही चमकते तारे’, ‘श्यामची शाळा’, ‘अन्य’, ‘बिटरस्वीट’, ‘चाहतो मी तुला’ आणि ‘एक होती राणी’ या अशा वेगळय़ा पठडीतील चित्रपटांचे लेखक महेंद्र पाटील यांनी आगामी ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद…

– नुकताच तुमच्या ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला . नेमके काय वेगळेपण आहे या चित्रपटात?
उत्तर : हा चित्रपट आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे, तरी तो वेगळा आहे. कारण आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतो, पण आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असून आपण त्याला घाबरतो. पूर्ण आयुष्य आपण सन्मानाने जगतो, तर आपले मरणसुद्धा सन्मानाने आणि आपल्या मर्जीनुसार असावे अशी गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘आता वेळ झाली.’

– दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
उत्तर : अतिशय छान. या क्षेत्रात काम सुरू केल्यापासून दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी काहीतरी लिहिता यावे अशी इच्छा मनात होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. जेव्हा या चित्रपटाची पटकथा वाचली त्याक्षणी या भूमिकेला दिलीप प्रभावळकर खूप छान न्याय नेतील हा विचार मी बोलून दाखवला आणि तसेच झाले. रोहिणी हट्टंगडी आणि दिलीप प्रभावळकर यांनी कठीण विषय सहज, सुंदरपणे अभिनय करून अतिशय वेगळय़ा उंचीवर हा चित्रपट नेऊन ठेवला.

– ‘मी सिंधुताई सपकाळ’ नंतर अनंत महादेवन हे पुन्हा एकदा मराठीत चित्रपट करत आहेत. त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
उत्तर : अनंत महादेवन यांच्या सोबत मी ‘कडुगोड’ (बिटरस्वीट) हा चित्रपटसुद्धा केला होता. त्या चित्रपटापासून त्यांच्या सोबत मी जोडलो गेलो आणि खूप काही नवीन शिकायला मिळाले. एखादी सोपी गोष्ट असते, पण तिला एका महान कलाकृतीत कसे रूपांतरित करायचे ही गोष्ट त्यांच्याकडून शिकलो आणि अनंत महादेवन नेहमी म्हणतात की, नवीन प्रयोग करायचे असतील व मनासारखा चित्रपट करायचा असेल तर मराठी चित्रपट करावा. त्याप्रमाणे ते करतात आणि मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते हे माझे भाग्य समजतो. मी, आम्ही एकत्र केलेला ‘कडुगोड’ हा चित्रपटसुद्धा लवकरच भेटीला येईल.

– प्रेक्षकांना काय सांगाल?
उत्तर : हा चित्रपट फक्त मनोरंजन नसून मनाला अंतर्मुख करणारा चित्रपट आहे. आपल्याला मनाच्या गाभाऱयात डोकावून पाहायला शिकवणारा चित्रपट आहे. असे चित्रपट दशकात एकदाच बनतात. त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की पहावा अशी मी सर्वांना आमच्या सर्व टीमच्या वतीने विनंती करतो.