चाहत्यांसाठी खुशखबर! धोनीसाठी फेअरवेल सामना आयोजित करण्यास बीसीसीआय तयार, पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. धोनीच्या निवृत्तीनंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांसह त्याच्या चाहत्यांनी फेअरवेल सामना आयोजित करण्याची मागणी केली. आता बीसीसीआयने देखील याची तयारी दर्शवली आहे. क्रिकेट बोर्ड आगामी आयपीएल दरम्यान धोनीशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर यावर निर्णय घेईल, असे एका बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सध्या कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका होणार नाहीय. त्यामुळे आयपीएल नंतर याबाबत निर्णय होऊ शकतो. धोनीने देशाला खूप काही दिले असून त्याला फेअरवेल सामना खेळण्याची संधी मिळावी असे सर्वांना वाटते, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. धोनीसाठी एक फेअरवेल सामना आयोजित करावे असे आम्हालाही वाटले होते, मात्र धोनी एक वेगळा खेळाडू आहे. जेव्हा त्याने निवृत्तीची घोषणा केली तेव्हा कोणीही याबाबत विचार केला नव्हता, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच धोनीने फेअरवेल सामन्याबाबत काही बीसीसीआयला काही सांगितले का याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले की, नाही. मात्र आयपीएल दरम्यान धोनीशी याबाबत चर्चा केली जाईल आणि फेअरवेल सामना किंवा मालिका आयोजित करण्याबाबत त्याचे मत विचारात घेतले जाईल. तो त्याचा हक्क असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, याआधी झारखंडचे मुख्यमंत्री, माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी देखील धोनीसाठी एक फेअरवेल सामना आयोजित करावा अशी मागणी केली. ‘बीसीसीआयने धोनीसाठी फेअरवेल सामना आयोजित केल्यास आनंद होईल. तो एक महान खेळाडू असून चाहते पुन्हा त्याला मैदानावर पाहण्यास उत्सुक आहेत’, असे मदन लाल म्हणाले.