
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फिनिशर अशी ओळख असणारा महेंद्रसिंग धोनी विश्वचषक सामन्यात उपांत्य फेरीत हिंदुस्थानी संघाचा पराभव झाल्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. या काळात त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र, धोनी क्रिकेटपासून लांब असला तरी तो आपल्या मित्रांसोबत गोल्फसह इतर खोळांचा आनंद लुटत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. तसेच त्याने त्याच्या वाहनांच्या ताफ्यात काही नव्या गाड्या घेतल्या होत्या. त्याचेही फोटो सोशल मीडियावर आले होते. आता धोनीचा कुटुंबीयांसोबतचा बर्फाळ प्रदेशातील फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेत आहे.
धोनी सध्या कुटुंबीयांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी बर्फाळ प्रदेशात गेला आहे. या ठिकाणी धोनी त्याची मुलगी जीवासोबत स्नो मॅन म्हणजेच बर्फापासून माणसाचा पुतळा बनवत असल्याचे फोटो धोनीची बायको साक्षी यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
बर्फाळ प्रदेशात सैर करण्याची मजा धोनी कुटुंबीयांसोबत लुटत आहे. बर्फाळ प्रदेशात फिरताना जीवाला स्नो मॅन बनवण्याची कल्पना सुचली आणि धोनी तिला स्नो मॅन बनवण्यासाठी मदत करत असल्याचे फोटोत दिसत आहे. मात्र, हा फोटो नेमक्या कोणत्या ठिकाणचा आहे, हे साक्षी यांनी सांगितले नाही.
























































