शासन, प्रशासन आणि लोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. महेश केळुसकर

‘स्वामीराज प्रकाशन’ या संस्थेच्या वतीने ‘मराठी आठव दिवस’ हा आगळावेगळा उपक्रम दर महिन्याच्या 27 तारखेला राबवला जातो. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर कुठल्याही शहरात गावात ‘मराठी’ विषयक कार्यक्रम सादर होतो. मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने या उपक्रमाची आखणी केली जाते. त्या अनुषंगानेच हा लेखनप्रपंच…

मे 1960 1 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मराठी भाषकांचे राज्य प्रस्थापित झाले. महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा असलेली मराठी ही हिंदुस्थानातील मान्यताप्राप्त 22 भाषांपैकी एक आहे. जगात दहावी आणि हिंदुस्थानात चौथी अशी ही भाषा 10 कोटी मराठी लोक बोलतात. मॉरिशस आणि इस्रायल या देशांनी स्थानिक भाषा म्हणून मराठीला मान्यता दिलेली आहे. नवव्या शतकापासून प्रचलित असलेली मराठी भाषा 72 देशांमध्ये आणि हिंदुस्थानातील 36 राज्यांमध्ये पसरलेली आहे. महाराष्ट्रातील 15 विद्यापीठांमध्ये मराठीचं अध्यापन केलं जातं. मराठी भाषेत दरवर्षी सुमारे 2000 नवी पुस्तकं प्रकाशित होतात. सुमारे 500 दिवाळी अंक निघतात. छोटी-मोठी मिळून सुमारे 250 साहित्य संमेलने होतात. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. (ज्याला 50 लाख रु.चं अनुदान दरवर्षी शासनाकडून मिळतं.) मराठी ग्रंथव्यवहाराची वार्षिक उलाढाल सुमारे 250 कोटी रुपयांची आहे.

मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत भाषा संचालनालय, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य-संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांचे कामकाज चालते. या चारही संस्थांनी मराठीसाठी मोठय़ा उमेदीने जे उपक्रम चालवले आहेत तेही मराठी भाषेच्या संवर्धनार्थ हितकारी ठरणारे आहेत. ते जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचायचे असतील आणि मराठीच्या हितार्थ लोकसहभाग वाढवायचा असेल तर या सर्व उपक्रमांनी पूर्ण केलेल्या उद्दिष्टांविषयी, सुरू असलेल्या कामांविषयी आणि भविष्यातील संकल्पांविषयीची एकत्रित माहिती पुस्तिका शासनाने प्रसिद्ध करावयास हवी.

विद्यमान शासनाचा मराठी भाषाविषयक घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘मराठी भाषा भवन’ची निर्मिती. 2100 चौ.मी. क्षेत्रातील उभ्या राहणाऱया या मानदंड वास्तूसाठी व अंतर्गत दालनांसाठी वगैरे सुमारे 126 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण व्हावयास हवे, नाहीतर खर्च वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील मरीन लाइन्ससारख्या मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीत तळमजल्यासहित 7 मजल्यांची भव्य इमारत उभी राहणे, दर्शनी 50×35 फूट आकाराचा महाराष्ट्राचा भव्य नकाशा प्रदर्शित करणे आणि त्या नकाशात मराठी भाषेच्या उक्रांतीत योगदान देणाऱया सर्व प्रतिष्ठत व्यक्तिमत्त्वांच्या स्थानांचे चित्रण असणे हे सर्व काम अभिमानास्पद असणार आहे. या वास्तूतील संपूर्ण एका मजल्यावर ‘मराठी बोली प्राधिकरणा’च्या कार्यालयास व बोलीसंबंधी 53 भित्तिफलकांना जागा मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या लोकसाहित्यासाठीही एक स्वतंत्र मजला राखून ठेवला पाहिजे. त्यातून मराठी भाषेचे समग्र दर्शन होईल. आणखी एक सूचना म्हणजे, शालिवाहन शके 934 (इ.स. 1012) मधील मराठीतील जो पहिला शिलालेख रायगड जिल्हय़ातील अलिबागजवळील अलिबाग-चौल रस्त्यावरील अक्षी या गावात आढळलेला आहे. त्याची प्रतिकृती ‘मराठी भवन’च्या प्रवेशद्वारावर स्थापित करावी.

शासन व्यवहारात आणि लोकव्यवहारात मराठीचा वापर वाढवण्यासाठी विद्यमान महाराष्ट्र शासन आणि प्रशासन ठोस पावले उचलत आहे. भाषाविषयक फक्त कायदे करून न थांबता त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी सजग आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मराठीच्या प्रभावी वापरासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय मराठी भाषा समित्यांची स्थापना केली आहे. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण (राजभाषा) विधेयक 2022 मंजूर झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात आता ‘मराठी भाषा अधिकारी’ची नियुक्ती करणे भाग आहे. हे अधिकारी विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलतील. अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. मुंबईसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषेतून कामकाज करणे अनिवार्य आहे. ते टाळता येणार नाही. राज्यातील सर्व दुकाने, आस्थापनांच्या पाटय़ा मराठी भाषेत ठळकपणे देवनागरी लिपीत असल्याच पाहिजेत, दहापेक्षा कमी कामगार असतील त्या आस्थापनांनाही कायद्यातून पळवाट काढता येणार नाही. तथापि, मराठीच्या हितासाठी आणखीही काही गोष्टी करण्यासंबंधी मराठी भाषा विभागाने पुढाकार घेतला पाहिजे.

1) मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी शाळा बंद का पडत चालल्या आणि या टिकवण्यासाठी, त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी, मराठीकडे पालक आणि विद्यार्थी पुन्हा वळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल शिक्षणतज्ञ व भाषातज्ञांची एक सत्यशोधन समिती नेमून सविस्तर अहवाल घेतला गेला पाहिजे. त्यातील सूचनांची अंमलबजावणी सकारात्मक दृष्टीने व्हायला हवी.
2) महाराष्ट्रात ज्या अमराठी खासगी आस्थापना व बडे उद्योगसमूह आहेत, तेथे त्यांनी मराठी भाषा अधिकारी व सहाय्यक कर्मचाऱयांची नेमणूक करण्यासंबंधी राज्य शासनाने आग्रह धरला पाहिजे.
3) आकाशवाणी, दूरदर्शन व खासगी एफ.एम. वाहिन्यांवर मराठी कार्यक्रमांचे प्रमाण किती आहे याचे सर्वेक्षण करून या प्रसार माध्यमांवर मराठीचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पाठपुरावा झाला पाहिजे.
4) दरवर्षी आपण फक्त 27 फेब्रुवारीला ‘मराठी गौरव दिन’ साजरा करण्याचे कर्मकांड करतो. पण अलीकडे ‘स्वामीराज प्रकाशन’सारख्या संस्थेने दर महिन्याला 27 तारखेला ‘मराठी आठव दिवस’ या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात व हिंदुस्थानातील अन्य राज्यांत मराठी भाषा जागृतीचे जे महत्त्वाचे कार्य चालवले आहे त्याला राज्य शासनाने भरीव आर्थिक पाठिंबा देऊन, आपण प्रत्यक्ष लोकसहभागाबाबत गंभीर व जागरूक आहोत हे दाखवून दिले पाहिजे.
5) पूर्वी बहुतेक राज्यांत ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ शासनातर्फे स्थापन करण्यात आली होती. आता फक्त नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्र चालू आहे. पण पहिल्या टप्प्यात नव्याने गोवा, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड व मध्य प्रदेश या राज्यांत महाराष्ट्र परिचय केंद्रे सुरू झाली तर ते तेथील मराठी भाषकांसाठी आणि महाराष्ट्रासाठीही लाभदायक ठरणार आहे. यावर मंत्रिमंडळाने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा.
अर्थात मराठीच्या हितासाठी केवळ शासन व प्रशासनानेच सर्व काही करावे अशी अपेक्षा ठेवून चालणार नाही. प्रत्येक मराठी भाषकाने आपल्या मातृभाषेच्या, राजभाषेच्या उत्कर्षासाठी तन-मन-धनाने या महत्त्वाकांक्षी मोहिमेत सामील झाले पाहिजे.

(लेखक ज्येष्ठ मराठी साहित्यकार, अभ्यासक व भाषा कार्यकर्ते आहेत)

[email protected]