
यंदाचा अकरावा ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या 1 मार्च रोजी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती संयोजक जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गेली 35 वर्षे वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाद्वारे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे या कलाकाराचे स्मरण दानवे परिवारातर्फे केले जाते. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मरणार्थ 1 मार्च रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त सन 2011 पासून हा कलायात्री पुरस्कार नाटक, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमावर पकड असणाऱ्या रंगकर्मींना देण्यात येतो.
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजपर्यंत दिलीप प्रभावळकर, डॉ.मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ.गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर या रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यंदा जयशंकर दानवे यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त यंदाचा अकरावा हा कलायात्री पुरस्कार महेश कोठारे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारानंतर महेश कोठारे यांची प्रकट मुलाखत होणार असल्याचेही दानवे परिवाराकडून सांगण्यात आले आहे.
























































