चंद्रपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधलं नाट्य संपुष्टात

1150

चंद्रपूरच्या जागेसाठी उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेलं नाट्य अखेर रविवारी संपुष्टात आले आहे. दोन उमेदवारांनी दाखल केलेल्या एबी फॉर्मवर निवडणूक अधिकाऱ्यांनी किशोर जोरगेवार यांचा अर्ज रद्द ठरवीत महेश मेंढे हेच अधिकृत उमेदवार असल्याचा निर्वाळा दिला.

चंद्रपूरच्या जागेसाठी सक्षम उमेदवार म्हणून काँग्रेसनं किशोर जोरगेवार या कार्यकर्त्याला तीन दिवसांपूर्वी पक्षामध्ये प्रवेश घ्यायला लावला होता. दिल्लीत प्रवेश घेताना त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिलं. मात्र त्याचवेळी महेश मेंढे या गतवेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारालाही  उमेदवारी देण्यात आली. नवल म्हणजे या दोघांनाही पक्षानं एबी फॉर्म दिले. त्यानुसार किशोर जोरगेवार यांनी काल मेंढे यांच्यापूर्वी जाऊन अर्ज सादर केला. त्यानंतर मेंढे यांनीही अर्ज दिला. एकाच पक्षाचे दोन उमेदवार एबी फॉर्मसह रिंगणात आल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर निर्वाळा देत जोरगेवार यांचा एबी फॉर्म रद्द ठरवला. मात्र, हा निर्णय पक्षपाती असून, भाजपचा विजय सोपा व्हावा, यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून आपला फॉर्म रद्द करण्यात आल्याचा आरोप जोरगेवार यांनी केला. माझा फॉर्म कोणत्या नियमानुसार रद्द केला याचे उत्तर अधिकारीही देऊ शकले नाही.  हा सत्तेचा दुरूपयोग असल्याचा आरोप किशोर जोरगेवार यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या