कोरोनाला हरवण्यासाठी महिला बचत गटांचा पुढाकार, दीड लाख मास्कची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभर थैमान घालणाऱया कोरोना विषाणूविरुद्ध आरोग्य यंत्रणा लढा देत असून, जनतेला स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळण्याचे आवाहन होत आहेत. या पार्श्वभूमीवर घरात शांत न बसता नाशिक जिह्यातील शेकडो महिला बचत गट मास्क तयार करून या लढय़ात आपला सक्रिय सहभाग नोंदवित आहेत. नाशिक जिह्यातील सुमारे दीडशे गटांनी अवघ्या काही दिवसात तब्बल 1 लाख 70 हजार तीन घडय़ांचे मास्क तयार करण्याचा विक्रम रचला आहे. आरोग्य केंद्र, रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स, ग्रामपंचायत, तसेच विविध ठिकाणांहून त्यांच्या या मास्कची मागणी वाढली असून, अहोरात्र या महिला मास्क तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे हे काम प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नाशिक जिह्यात शेकडो महिला बचत गट व ग्रामसंघ कार्यरत आहेत. कोरोनाचे हे भीषण संकट लक्षात घेऊन बचत गटांनी स्वच्छतेचे सर्व निकष पाळून मास्क तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी चांगल्या प्रतीचे कापड, त्याचे निर्जंतुकीकरण, शिलाई काम, त्यानंतरची स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग याबाबत या गटातील सदस्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे, अशी माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक बंडू कासार यांनी दिली.

जिह्यातील पंधरा तालुक्यांतील दीडशेहून अधिक गटांनी 24 मार्चपासून हे काम हाती घेतले. त्यांनी आतापर्यंत 1 लाख 70 हजार मास्क तयार केले आहेत. त्याची किंमत 4 ते 20 रुपये अशी असून, या गटांना सुमारे 1 लाख 63 हजार मास्कच्या विक्रीतून 14 लाख 60 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. या गटातील महिला आपापल्या घरी हे मास्क तयार करण्याचे काम करतात. ज्यांना घरी जागेअभावी काम करणे शक्य नाही, त्या एकत्रित मात्र सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून काम करीत आहेत, हे काम करताना त्या आवर्जून स्वतःदेखील मास्क वापरत आहेत.

या मास्क निर्मितीत निफाड तालुका अग्रेसर आहे. पिंपळगाव-बसवंत येथील स्वराज ग्रामसंघाने सर्वाधिक मास्क तयार केले आहेत. पिंपळगावचा स्वराज हिरकणी महिला उत्पादक गट प्रतीदिन तीन हजार मास्क शिवून देत आहे. त्यांनी आतापर्यंत 70 हजार मास्क निर्मितीचा टप्पा गाठला आहे. निफाड तालुक्यातील नारायणटेंभी या गावातील लोकांना मास्कचे वाटपही करण्यात आले आहे, अशी माहिती निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी दिली.