Mahindra EV – इलेक्ट्रीक कारचा एक्सलरेटर अडकून राहिल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. महिंद्रा कंपनीच्या एक्सयुव्ही 400 कारला अपघात झाला आहे. ही गाडी इलेक्ट्रीक होती. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील बस स्थानकानजिक आज सकाळी साडे सातला हा अपघात झाला असून अपघातातून या गाडीचे मालक थोडक्यात बजावले आहेत.

या गाडीचे मालक अमोल मुखेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चारच महिन्यांपूर्वी त्यांनी महिंद्रा कंपनीची बॅटरीवर चालणारी सुमारे अठरा लाख रुपये किमतीची एक्सयुव्ही 400 ही गाडी खरेदी केली होती. बुधवारी सकाळी ते या गाडीतून गावातील आपल्या दुकानात आले होते, तिथून त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी गाडी सुरु केली. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने गाडीने वेग घेतला अमोल यांनी ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण गाडीने प्रचंड वेग घेतला होता आणि त्यावरील अमोल यांचे नियंत्रण सुटले होते. ही गाडी दगडांच्या ढिगाऱ्यावरून घरंगळत जात झाडावर आदळली. या अपघातात गाडीचे मोठेच नुकसान झाले आहे.