महिंद्रानं कॅनडातील व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय; शेअर बाजारावरही दिसला परिणाम

हिंदुस्थान आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणाव वाढत असल्याचं दिसत आहे. दोन्ही देशांनी उचलेल्या पाऊलांवरून तणाव स्पष्ट जाणवत आहे. अशातच महिंद्रा अँड महिंद्रानं एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेद्वारे कंपनीनं स्पष्ट केलं की त्यांची कॅनडा-आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशननं आपलं संपूर्ण कार्य थांबवलं आहे. महिंद्राकडे कंपनीत 11.18% हिस्सा होता. कंपनीने ऑपरेशन्स ऐच्छिक बंद करण्यासाठी अर्ज केला होता.

यासंदर्भात महिंद्रा अँड महिंद्रानं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आलं आहे की, ‘रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून 20 सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रं मिळाली आहेत, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे.’

यानंतर रेसननं आपलं कामकाज बंद केलं आहे, असं सांगण्यात आलं आहे. तसंच यापुढे 20 सप्टेंबर 2023 पासून कंपनीची सहयोगी नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

यासगळ्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही झाल्याचं दिसत आहे. दुपारी शेअर बाजाराचा निर्देशांक 600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये देखील 160 हून अधिक अंकांची घसरण पाहायला मिळाली.

दरम्यान आतापर्यंत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 1.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून बुधवारी 800 अंकांची घसरण यावेळी पाहायला मिळाली.