आई अपघातात गेली, वडील झांशीत अडकले; एकाकी बाळाला स्थानिकाकडे सोपवून प्रशासन गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून त्या महिला असल्याची माहिती मिळाली आहे. झांशी-मिर्झापूर रस्त्यावर हा अपघात झाला असून यात 12 जण जखमी झाले आहेत. या ट्रकमधून 17 जण प्रवास करत होते.

टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टायर फुटल्याने हा ट्रक उलटला आणि त्यातील 3 महिलांचा मृत्यू झाला अशी माहिती महोबाचे पोलीस अधीक्षक मणिलाल पाटीदार यांनी दिली आहे. अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

या अपघातानंतर प्रशासन कसं मुर्दाड असतं याचं दर्शन घडवणारी एक घटना घडली. ज्या महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला त्या महिलांमध्ये एका छोट्या बाळाची आईदेखील होती. ही आई आपल्या बाळासह गावाकडे निघाली होती. तिचा नवरा हा झांशीमध्ये असल्याने आता तिचं बाळ हे एकटं पडलं आहे. हा अपघात महोबा भागामध्ये झाला आहे. अपघातानंतर या बाळाला तिथल्याच एका स्थानिकाच्या हाती सोपवण्यात आलं आहे. ‘या मुलाची आई मृत्यूमुखी पडली आहे वडील झांशीमध्ये आहेत. मला सांगितलं की या बाळाला इथेच कुठेतर अॅडजेस्ट कर’ असं या स्थानिकाने म्हटलं आहे. मी इथला स्थानिक आहे मात्र या बाळाला घेऊन जाऊ कुठे असा सवाल या स्थानिकाने विचारला आहे.