महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द, लोकसभेत बाजू मांडण्याची संधीही दिली नाही! महिला मार्शल्सनी सभागृहाबाहेर फरफटत नेले

मोदी सरकारला अदानी प्रकरणात थेट प्रश्न विचारणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रॅण्ड खासदार महुआ मोईत्रा यांची अखेर आज खासदारकी रद्द करण्यात आली. ‘पॅश फॉर क्वेरी’प्रकरणी मोईत्रा यांना दोषी ठरविणारा इथिक्स कमिटीचा अहवाल लोकसभेत सादर झाला. अवघा एक तास त्यावर चर्चा झाली. मोईत्रा यांना बाजू मांडण्याची संधीही न देता केवळ बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाने खासदारकी रद्द केली. धक्कादायक म्हणजे, त्यानंतर महुआ मोईत्रा यांना महिला मार्शलनी अक्षरशः फरफटत ओढत उचलून सभागृहाबाहेर नेले.

हिंडेनबर्ग प्रकरण उघडकीस आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी अडचणीत आले होते. मोदी सरकार आणि अदानी यांच्या संबंधावर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. खासदार महुआ मोईत्रा यांनीही हा मुद्दा आक्रमकपणे लोकसभेत मांडला होता. यानंतर मोईत्रा यांच्यावर ‘पॅश फॉर क्वेरी’चा आरोप भाजप खासदारांनी केला. त्यावर संसदेत इथिक्स कमिटीकडे (नीतिमत्ता समिती) हे प्रकरण सोपविण्यात आले. इथिक्स कमिटीने महुआ मोईत्रा यांना दोषी ठरविले.

500 पानांचा अहवाल आणि 1 तास चर्चा

इथिक्स कमिटीचा 500 पानांचा अहवाल आज दुपारी 12 वाजता  कमिटीचे अध्यक्ष विनोदकुमार सोबकर यांनी सादर केला. या अहवालात मोईत्रा यांना दोषी ठरविले असून, त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, त्यांना बडतर्फ करावे, असा प्रस्ताव संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला. दुपारी एकपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर केवळ एक तास अहवालावर चर्चा झाली. चर्चेवेळी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी अहवाल वाचण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली. काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले, ‘500 पानांचा अहवाल वाचण्यासाठी तीन-चार दिवस दिले तर काही आभाळ कोसळणार नाही. इथिक्स कमिटी सदस्याच्या बडतर्फीची मागणी करते, हे मी पहिल्यांदाच पाहत आहे.’ मात्र, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वेळ वाढवून  देण्याची मागणी फेटाळली. गदारोळामुळे कामकाज दोन वेळा तहकूब केले. अखेर आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द केली. यावेळी विरोधी पक्षांची एकजूट पाहायला मिळाली. विरोधी पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकून सभात्याग केला.

बोलूच दिले नाही

ज्यांच्यावर आरोप केले, त्या महुआ मोईत्रा यांना लोकसभेत आपले म्हणणे मांडू दिले नाही. त्यांना बोलूच दिले नाही. उलट ‘2005मध्ये लोकसभेचे 10 खासदार बडतर्फ केले, तेव्हा त्यांनाही बोलण्यासाठी संधी दिली नव्हती,’ असा उल्लेख अध्यक्षांनी केला. तसेच मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याची घोषणा करताच लोकसभेत गोंधळ उडाला. मोईत्रा यांच्या संरक्षणासाठी तृणमूलच्या खासदारांनी त्यांच्याभोवती कडे केले. मात्र, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात महिला मार्शलना बोलाविले. महिला मार्शलनी मोईत्रा यांना फरफटत उचलून सभागृहाबाहेर नेले.

काय आहे प्रकरण?

अमेरिकेच्या हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती अदानी यांची प्रतिमा मलीन करणारे प्रश्न लोकसभेत विचारण्यासाठी महुआ यांनी व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागडय़ा भेटवस्तू घेतल्या. तसेच संसदेकडून दिला जाणारा लॉगिन आयडी व पासवर्डही हिरानंदानी यांना दिला होता, असा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केल्यावर हे प्रकरण चौकशीसाठी इथिक्स कमिटीकडे सोपविण्यात आले होते.

भाजपने लक्षात ठेवावे एक दिवस ते सत्तेत नसतील – ममता बॅनर्जी

महुआ यांच्या बडतर्फीचा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निषेध केला असून, ही कारवाई म्हणजे देशातील संसदीय लोकशाही पद्धतीचा विश्वासघात असल्याचा हल्लाबोल केला आहे. ‘संसदीय लोकशाहीसाठी ही लाजीरवाणी घटना आहे. भाजप आम्हाला निवडणुकीत हरवू शकत नाही म्हणून त्यांनी या प्रकारे सूडाचे राजकारण अवलंबिले आहे. मोईत्रा यांना बाजू मांडण्याची संधीही भाजपने दिली नाही. पण त्या आणखी मोठय़ा मताधिक्याने संसदेत परततील, एवढे नक्की. राक्षसी बहुमतामुळे आपण काहीही करू शकतो, असे भाजपला वाटते आहे. पण असा एक दिवस येईल, जेव्हा ते कदाचित सत्तेत नसतील, हे भाजपने लक्षात ठेवायला हवे,’ असा इशाराही ममता यांनी दिला.

नव्या महाभारताला सुरुवात झाली

संसदेच्या पायऱ्यांवर महुआ मोईत्रा यांनी आपले निवेदन वाचून दाखविले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार होते. कांगारु कोर्टाच्या या निर्णयामुळे आता नव्या महाभारताला सुरुवात झाली. विरोधी पक्षांना झुकवण्यासाठी मोदी सरकारने इथिक्स कमिटीचा वापर अस्त्र्ाासारखा केला. मला पैसे पिंवा भेटवस्तू दिल्याचे कोणतेही  पुरावे नाही. हिरानंदानी यांना जबाब नोंदवण्यासाठी कमिटीने बोलावले नाही. मी फक्त लॉगिन आयटी शेअर केला. त्यावरून मला  बडकर्फ केले. हे फक्त बोगस कांगारू कोर्टात घडले आहे, असा संताप मोईत्रा यांनी व्यक्त केला.

मी तुमचा शेवट पाहायला नक्की येईन

मी 49 वर्षांची आहे. अजून तीस वर्षे तुमच्याशी लढेन. संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर, रस्त्यावर सगळीकडे संघर्ष करेन. मी परतून येईन आणि तुमचा शेवट पाहायला नक्कीच येईन, असा निर्धार महुआ मोईत्रा यांनी यावेळी मीडियाशी बोलून दाखविला.