
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘जीवघेण्या’ माहुलमध्ये पुनर्वसन केलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आज तेराव्या दिवशीही सुरूच आहे. शेकडो कुटुंबांनी ऐन दिवाळीत आपल्या मुलाबाळांसह विद्याविहार येथील तानसा पाइपलाइनजवळ संसार मांडले आहेत. मात्र या आंदोलनाला तब्बल 13 दिवस उलटले तरी पालिका प्रशासन किंवा राज्य सरकार आंदोलनकर्त्यांकडे फिरकलेही नाही. त्यामुळे शेकडो कुटुंबीयांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, पर्यायी घराबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
मुंबईतील अनेक विकासकामांतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गेल्या अनेक वर्षांपासून चेंबूरजवळील माहुल येथे केले जात आहे. सध्या तब्बल साडेपाच हजारांवर कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत, मात्र या परिसरात असलेल्या केमिकल कंपन्यांच्या जीवघेण्या प्रदुषणामुळे शेकडो जणांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने प्रकल्पग्रस्तांना सुरक्षित जागी पर्यायी घरे देण्याचे आदेश देऊनही पालिका प्रशासन किंवा राज्य सरकारकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे रहिवाशांनी विद्याविहार येथील तानसा पाइपलाइनजवळ आंदोलन सुरू केले आहे.
आम्हाला माहुलमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे रिफायनरीच्या प्रदूषणामुळे रहिवाशांचे जीव जात आहेत. असे असताना पालिका किंवा सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत.
– रेखा घाडगे, आंदोलक
विषारी प्रदूषणात रहिवाशांचे नाहक जीव जात असल्यामुळे आंदोलन करून पालिका आणि सरकारचे लक्ष वेधायचे आहे. जोपर्यंत आमच्या आंदोलनाकडे प्रशासन लक्ष देत नाही तोपर्यंत हेच आमचे घर राहील. आता माघार घेणार नाही.
-अशोक म्हसकर, आंदोलक
पालिका प्रशासन किंवा राज्य सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवले जाणार असून रविवारी घाटकोपर पश्चिमेला साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबर रोजी ‘म्हाडा’, राज्याच्या मुख्य सचिवांसोबत रहिवाशांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीक्र करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
प्रकल्पग्रस्तांनी घाटकोपरमध्ये ‘काळी दिवाळी’ साजरी करून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मशाल घेऊन घाटकोपरमध्ये मूक मोर्चा काढला.



























































