
नोकरीच्या नावाखाली परदेशात नेऊन विविध देशांतील नागरिकांना टार्गेट करत सोशल मीडियावरून खंडणी मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या सलमान मुनीर शेख या मुख्य सूत्रधाराच्या दक्षिण सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने पासपोर्टवरील पत्ता बदलून तो मीरा रोड येथे राहत होता.
तक्रारदार हे परदेशी नोकरीच्या शोधात होते. त्यांना थायलँड येथे डेटा एण्ट्रीचे काम असून महिन्याला 70 हजार रुपये पगार मिळेल असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि त्याचे दोन मित्रदेखील त्या कामासाठी तयार झाले. सलमान त्यांना फेब्रुवारी महिन्यात थायलँड येथे घेऊन गेला. तेथे सलमान 5 जणांना थायलँड विमानतळावरून लाओस देशात घेऊन गेला. त्यानंतर पाच जणांचे पासपोर्ट काढून घेतले. तेथे विविध देशांतील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खंडणीच्या स्वरूपात पैसे उकळण्यास सांगितले. ते काम करायचे नसल्यास आणि पुन्हा हिंदुस्थानात परत जायचे असल्यास चिनी चलन युवान (20,000) लागतील अशी भीती त्यांना दाखवली.
सलमानने आणखी दोघांना लाओस येथे बोलावले. त्यानंतर सलमानने तक्रारदार यांची सुटका केली. मुंबईत आल्यावर तक्रारदार यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.