
राज्य पोलीस दलात आज मोठे फेरबदल करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱयांना बढत्या देऊन त्यांच्यावर नवीन जबाबदाऱया सोपविण्यात आल्या, तर अपर महासंचालक असलेले सदानंद दाते, जयजित सिंग, बिपिनकुमार सिंह यांची पोलीस महासंचालकपदी बढती करून त्यांना आहे त्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडचे सह आयुक्त मनोज लोहिया यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून धुरा देण्यात आली आहे.
बढत्या आणि बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱयांचा मार्ग अखेर मोकळा झाला. सरकारला त्यासाठी आजचा मुहूर्त मिळाला. जयजित सिंग यांना महासंचालक पदी बढती देऊन त्यांना ठाण्याच्या आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले आहे तर एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनाही महासंचालकपदी बढती देत त्यांच्याकडेही एटीएसची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपिनकुमार सिंह यांनाही महासंचालकपदी बढती मिळाली असून त्यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बढती व नवीन जबाबदारी मिळालेले अधिकारी पुढील प्रमाणेः
संजय दराडे- गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे), अनिल कुंभारे- दहशतवाद विरोधी पथक, महेश घुर्ये- राज्य राखीव पोलीस बल (पुणे), संजय शिंदे- सहआयुक्त (पिंपरी-चिंचवड), ज्ञानेश्वर चव्हाण- छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, दिलीप सावंत- सागरी सुरक्षा, आर.बी.डहाळे- संचालक(महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे), अशोक मोराळे- राज्य राखीव पोलीस बल (नागपूर), एच.एस.महावरकर- नांदेड परिक्षेत्र, निसार तांबोळी- प्रशासन (पोलीस महासंचालक कार्यालय), एस.डी.येनपुरे- गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे), जे.डी.सुपेकर- कारागृह विभाग (पुणे). याशिवाय छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक के. एम. एम प्रसन्ना यांच्याकडे पोलीस महासंचालक कार्यालयात आस्थापना विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून पिपंरी-चिंचवडचे सह आयुक्त मनोज लोहिया हे आता छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज पाहतील. निखिल गुप्ता यांची छत्रपती संभाजीनगर आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.
राज्यातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱयांनाही उपमहानिरीक्षकपदी बढती देऊन त्यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे असून त्या पुढीलप्रमाणेः
अभिनव देशमुख- दक्षिण प्रादेशिक विभाग, अनिल पारसकर- मध्य प्रादेशिक विभाग, एम. रामकुमार- अपर पोलीस आयुक्त (वाहतूक), शशीकुमार मीना- अपर पोलीस आयुक्त (गुन्हे, मुंबई शहर), प्रवीण पाटील- पश्चिम प्रादेशिक विभाग (पुणे शहर), संजय पाटील- अपर पोलीस आयुक्त (गुन्हे-नागपूर शहर), वसंत परदेशी- अपर आयुक्त (पिपंरी-चिंचवड), एस.डी.आव्हाड- उपमहानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग-पुणे), पी.पी.शेवाळे- उत्तर प्रादेशिक विभाग (नागपूर शहर), ए.एच.चावरिया – अपर आयुक्त (प्रशासन-पुणे शहर) तसेच उपमहानिरीक्षक असलेले वीरेंद्र मिश्रा हे मुंबईच्या विशेष शाखेचे अपर आयुक्त असतील तर दीपक साकोरे यांना नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अपर आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर ठाण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त पंजाबराव उगले यांच्याकडे ठाण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय मिलिंद मोहिते यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिक्षकपदी तर राजलक्ष्मी शिवणकर यांची राज्य राखीव पोलीस बल (दौंड)च्या समादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.





























































