ती भेट अखेरची ठरली! शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईने जागवल्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या काही महिने आधी संदीप 41 दिवसांच्या सुट्टीवर घरी आला होता. या सुट्टीत त्याने आपल्या सगळ्या आवडीनिवडी जोपासल्या. पुन्हा डय़ुटीवर रुजू व्हायची वेळ आली तेव्हा त्याने ट्रेनने जायचे ठरवले. घरापासून रेल्वे स्टेशन जवळच असल्याने मला तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल, असे तो आम्हाला म्हणाला होता. वडिलांसोबत तो रेल्वे स्टेशनला जायला निघाला त्यावेळी त्याचा हात सोडूच नये असे वाटत होते. आम्हा मायलेकांची ही शेवटची भेट ठरेल, असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते, अशी शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची आठवण सांगतानाच त्यांची आई धनलक्ष्मी उन्नीकृष्णन यांना अश्रू अनावर झाले.ट

मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करताना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ‘मेजर’ या बायोपिकची निर्मिती होत आहे. ताज हॉटेलमध्ये शुक्रवारी या रियल हीरोला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मेजर संदीप यांचे वडील के. उन्नीकृष्णन आणि आई धनलक्ष्मी उन्नीकृष्णन यांच्यासह चित्रपटातील कलाकार अदिवी शेष ,सई मांजरेकर उपस्थित होते.

यावेळी के. उन्नीकृष्णन म्हणाले, 26 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता आमचे पह्नवर शेवटचे बोलणे झाले. मुंबईत जे काही सुरू आहे तिथे मोठय़ा स्तरावरील कारवाई होऊ शकते. तुम्ही टीव्ही बघत राहा, एवढंच संदीप मला म्हणाला. मात्र, तो स्वतः या मिशनसाठी मुंबईला जातोय याबाबत आम्हाला काहीच सांगितले नव्हते. 27 नोव्हेंबरला त्याने दिवसभर पह्न उचलला नाही. त्यानंतर ही वाईट बातमी आम्हाला मिळाली. संदीप माझा फक्त मुलगा नव्हता तर तो माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक होता, असेही ते म्हणाले.