मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट होणार

दत्तक वस्ती योजनेत एक मोठा घोटाळा आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी त्यामध्ये सामील आहेत. स्वयंसेवी संस्था नियमापेक्षा कमी कामगार नेमतात, झोपडपट्टीतील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. आणि त्या पैशाचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी आज विधानसभेत केला. त्यावर या योजनेचे ऑडिट करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.

कामगारांच्या मानधनाचा गोलमाल

झोपडपट्ट्यांमधील कचरा संकलन आणि तो डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्यात दत्तक वस्ती योजनेची महत्त्वाची भूमिका आहे. झोपडपट्ट्यांमधील कचरा एकत्र करून पुढे महापालिका तो डम्पिंग ग्राऊंडला घेऊन जाते. ज्या भागात 15 कामगार हवेत तिथे स्वयंसेवी संस्था 5 ते 10 कामगारच ठेवतात. उरलेल्या कामगारांच्या मानधनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.