Video-नांदेडमध्ये भीषण पाणी टंचाई, एका मिनिटात 8 हजार लिटर पाणी होते रिकामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नांदेड

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेरळी खुर्द या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र या गावात दिवसातून जेमतेम एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. गावातील पाणी टंचाई पाहून एका दात्याने खासगी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाण्याचा टँकर हौदात रिकामे होताच, व्याकूळ झालेले गावकरी एका मिनिटात 8 हजार लिटर पाणी आपल्या टाक्यांमध्ये भरून घेतात. पाणी टंचाईचा भीषण आणि विदारक वास्तव असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्यात 1972 पेक्षा भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडमधील मुखेड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाची दाहकता भयावह आहे. येथील नदी-नाले, तलाव, विहिरी, विंधन विहिरी आदी जलस्रोत आटून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बेरळी खुर्द गावाच्या तीन ते चार किलोमीटर परिसरात पाण्याचे स्रोत शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना शासकीय टँकरवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे पाण्याचा टँकर हौदात रिकामे होताच नागरिक अक्षरश: पाण्यावर तुटून पडतात. गावच्या सरपंच राधाबाई गिरबनवाड, उपसरपंच मारुती फसकुलवाड, सिद्धार्थ कांबळे यांनी शासनाकडे आणखी एका टँकरची मागणी करूनही, सरकारी दिरंगाईमुळे टँकरची संख्या वाढवली जात नाही. त्यामुळे तालुक्यातील शेषराव चव्हाण यांनी या गावासाठी स्वखर्चाने दररोज एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. टँकर गावातील एका हौदात पाणी टाकताच पाण्यासाठी व्याकूळ झालेले नागरिक, महिला, लहान बालके, वयोवृद्ध एका मिनिटात 8 हजार लिटर पाण्याचे टँकर खाली करून आपल्या टाक्यांमध्ये पाणी भरून घेत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, तीव्र दुष्काळ असलेल्या मुखेड तालुक्याला केवळ 60 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.