
गेल्या सहा वर्षांत मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण दलात कोणताही मोठा प्रोजेक्ट सुरू झालेला नाही. आधुनिक पाणबुडी, माईनस्वीपर, लाईट युटिलिटी व्हेईकल, ट्रान्सपोर्ट एयरक्राफ्ट आणि फायटर जेटस्सारखे प्रोजेक्ट लटकलेले आहेत.
दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रोजेक्टस् 3.5 लाख कोटी रुपयांचे आहेत. हे प्रोजेक्ट एकतर रखडलेले तरी आहेत किंवा वेगवेगळ्या टप्प्यांत फिरत आहेत. त्यातही रशियासोबतचा उत्तर प्रदेशातील कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरीत 7 लाख 50 हजार एके 203 रायफल बनवण्याचा नवा प्रोजेक्ट सगळ्यात आधी सुरू होण्याची शक्यता आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या मते, स्वदेशी बनावटीचे संरक्षण साहित्य बनवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. त्यामध्ये डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर आणि एफडीआय धोरणात बदलाचा समावेश आहे. स्ट्रटिजिक पार्टनरशिप मॉडेलची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तामीळनाडू आणि उत्तर प्रदेशात डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉरिडोर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काम सुरू व्हायला वेळ लागेल
संरक्षण दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वदेशी संरक्षण उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षात काम सुरू व्हायला वेळ लागेल. काही प्रकल्प सुरू होणार आहेत. एके 203 रायफलींच्या करारावर नवीन वर्षात स्वाक्षरी होईल. याच पद्धतीने 56 सी-295 एअरक्राफ्ट बनवण्यासाठी टाटा एअरबस प्रोजेक्टच्या किमतीवर चर्चा सुरू आहे. मात्र त्याला वेळ लागेल. सिंगल वेंडर आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या मान्यतेसाठी जाईल.

























































