
सामना प्रतिनिधी । नगर
महाराष्ट्र वारंवार ऑनर किलिंगच्या घडणार्या घटना रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेतत्या आमदार निलम गोर्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ऑनर किलिंगच्या घटनेत वाढ होत चालायचे निदर्शनास येत आहे. दि .6 मे 2019 रोजी निघोज ता.पारनेर,जि.अहमदनगर येथे मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांना समाजात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी नवविवाहितेला आणि पतीला जाळून टाकले. या दोघांना खोलीत बंदीस्त करून पेट्रोल ओतून हत्या करण्याच्या प्रयत्न केला आहे. यात रुक्मिणी रणसिंग (वय 19) असे पत्नीचे नाव असून मंगेश रणसिंग (23) असे पतीचे नाव आहे. यांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मंगेश 1 मे रोजी रुक्मिणीला भेटण्यासाठी निघोजमधील ‘वाघाचा वाडा’ सासरवाडीत आला होता. तिथे त्याचा सासरच्यांशी वाद झाला. रुक्मिणीचे वडील, मामा, काका या तिघांनी रुक्मिणीला पाठविण्यास नकार दिला. मंगेशला मारहाण केली. रुक्मिणीने या मारहाणीला विरोध केला व ती मंगेशबरोबर जायला निघाली. तिघांनी या दोघांना घरात कोंडले आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामध्ये मंगेश गंभीर जखमी असून रुक्मिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या काही दिवसापूर्वी याच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कौठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पिडीत मुलीच्या पालकांनी तिला लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले आणि तिचा खून केला. एकाच जिल्ह्यात एका महिन्यात दोन ऑनर किलिंगची दुसरी दुर्घटना घडली.
समाजातील लोकांना समाज प्रबोधन घडवायचं प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच समाजात हिंसाचार घडणार्या घटना रोखण्यासाठी सरकारने या विषयी कायदा करण्यात यावा अशी मागणी काही संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील ऑनर किलिंगच्या घटनेत सुमीत शिवाजीराव वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून यातील दोन आरोपींना जमीन मिळाला आहे. मृत सुमित यांची पत्नी हिच्या जीवितास धोका निर्माण झाल्याबाबत तिने मला दूरध्वनीवरून कळविले आहे. याघटनेत आरोपीची जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात याव्यात., मंगळवेढ्यातील सलगर मध्ये अनुराधा बिराजदार या डॉक्टर मुलीने श्रीशैल्य बिराजदार यांच्याशी घरच्यांच्या विरुद्ध विवाह केले म्हणून अनुराधा हिच्या आई वडिलांनी हत्या दि. 04 ऑक्टोबर, 2018 रोजी केली. तर दुसर्याच दिवशी अनुराधा यांचे पती श्रीशैल्य याचा देखील खून झाला. याबाबत अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या घटनेतील आरोपींना देखील अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. पुणे येथे हिंजवडी येथे ही काल ऑनर किलिंगतुन तुषार पिसाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. याघटनेची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी असे गोर्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.






























































