वगळलेल्या कोळीवाडे, गावठाणांचे सर्वेक्षण करा! महसूल मंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील 41 कोळीवाडे व 189 गावठाणे आहेत.महापालिकेने सर्वेक्षणातून वगळलेल्या 17 कोळीवाडे व 137 गावठाणांचे सर्वेक्षण करताना त्या ठिकाणी राहणार्‍या लोकप्रतिनिधींना सहभागी करून सर्वेक्षण लवकर  पूर्ण करा. तसेच सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत कोळीवाडे व गावठाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका, त्यांना नोटिसा पाठवू नका असे स्पष्ट आदेश  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी मंत्रालयात दिले.

उपनगरातील 15 कोळीवाडे सीमांकनातून वगळल्यामुळे शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या समवेत भेट घेतली होती. तसेच पालिका सभागृहात 66 ब अन्वये हरकतीचा मुद्दा घेऊन या महत्त्वाच्या विषयाला त्यांनी वाचा फोडली. शिवसेना ही मुंबईच्या आद्य नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभी असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घ्या असे आदेश त्यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांना दिले होते. प्रभू यांनी मुखतमंत्र्यांना पत्र पाठवून उपनगरातील 15 कोळीवाड्यांचे लवकर  सर्वेक्षण करा, अशी आग्रही मागणी केली होती.

त्यामुळे गुरूवारी दुपारी महसूलमंत्र्यांच्या दालनात याबाबत महत्त्वाची बैठक झाली. यावेळी उपनगरात काही ठिकाणी सीमांकन झालेले कोळीवाडे व गावठाणे एकत्र दाखवले असून काही ठिकाणी आदिवासी पाडे हे कोळीवाडे म्हणून दाखवण्यात आल्याची तक्रार आमदार सुनील प्रभू व आमदार-विभागप्रमुख ऍड. अनिल परब, आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस, आमदार मनीषा चौधरी यांनी या बैठकीत केली. महसूलमंत्र्यांनी यावेळी मत्स्यव्यवसाय खात्याला चौकशीचे आदेश दिले.

या बैठकीला उपनगरचे पालकमंत्री व शिक्षणमंत्री विनोद तावडे, मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतवर, महसूल खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पालिका आयुक्त अजोय मेहता, आमदार सुनील प्रभू, आमदार-विभागप्रमुख ऍड. अनिल परब, वरळीचे आमदार सुनील शिंदे, दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी, उपमहापौर हेमांगी वरळीवर, नगरसेविका शीतल म्हात्रे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त ग्रॉडफे पिमेटा, अनिल भोपी, समाजसेवक संजय सुतार, उपविभागप्रमुख विनायक सामंत व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रभू यांनी मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे यांचे सीमांकन व समस्यांबाबत महसूलमंत्र्यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले. वगळलेल्या कोळीवाड्यांच्या ठिकाणी बिल्डर लॉबीचा डोळा असून भविष्यात येथे एसआरए योजना येण्याची शक्यता असून कोळीबांधवांवर उपासमारीची पाळी येईल अशी भीती आमदार प्रभू यांनी व्यक्त केली. तर सीमांकनाचे निकष आधी ठरवावेत अशी आग्रही मागणी परब यांनी केली.