रंगरंगोटी – नवे चेहरे! नवी ओळख!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सचिन कुंभार

प्रत्येक चेहरा रंगभूषेतून मला नवे काहीतरी शिकवून जातो.

रंगभूषेमुळे कलाकाराच्या व्यक्तिरेखेची नेमकी ओळख रसिकांना होते. त्यामुळे रंगमंचावरील कलेची सुरुवात रंगभूषेने होते असं मला वाटतं. हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी नाटकांसाठी रंगभूषा करण्याची संधी आतापर्यंत मला मिळाली आहे. ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘आंधळं दळतंय’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘लोच्या झाला रे’, ‘सही रे सही’, ‘आरण्यक’ अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱया नाटकांतील कलाकारांना रंगभूषेद्वारे साकारले आहे. सध्या चित्रपट हे माध्यमही स्वीकारले आहे. त्यासाठी रंगभूषाही करत आहे.

लहानपणापासूनच चित्रकलेची खूप आवड होती. हा विषय आवडता असल्याने भरतनाटय़म, क्लासिकल कला सादर करणाऱया कलाकारांच्या चेहऱयावर केलेल्या मेकअपचे निरीक्षण करू लागलो. यातूनच ही कला मला केव्हा आवडू लागली ते मलाही कळले नाही. यामुळेच मला माझ्या काही मित्रांनी माझी ओळख आनंद परमार या एका मोठय़ा रंगभूषाकाराशी  करून दिली. त्यांनाच मी माझे गुरू मानतो. याबरोबर अनिल आरोसकर, किशोर पिंगळे, प्रशांत टिपणीस, अभय मोहिते आणि उलेश खंदारे यासारख्या मोठय़ा रंगभूषाकारांकडूनही मला बरंच काही शिकायला मिळालं. अशा प्रकारे काम करता करता मी रंगभूषाकार म्हणून घडू लागलो. भरतनाटय़म, क्लासिकल, वेगवेगळ्या प्रकारच्या मेकअपचे अनेक पैलू, सध्या बाजारात प्रसिद्ध असलेला ब्रायडल मेकअप, वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा कशा करायच्या हे शिकायला मिळाले. रंगभूषाकार उलेश खंदारे यांच्याकडून मेकअपशी निगडित असा अनेक गोष्टी शिकलो. शिकलेले काम प्रत्यक्ष करायलाही मिळत आहे.

रंगभूषा ही अशी कला आहे की, यामध्ये कोणीही असे म्हणू शकत नाही की माझे या कलेतील शिक्षण आता पूर्ण झाले आहे. कारण दररोज नव्याने काही ना काही तरी शिकायला मिळतच असते. इतर रंगभूषाकार कशी रंगभूषा करतात हे पाहिले, त्यांचे निरीक्षण केले तरी खूप नव्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यांचे निरीक्षण करूनही मी शिकायचा प्रयत्न करत असतो. या क्षेत्रामुळे अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास लाभला. यापुढेही अनेक वेगवेगळ्या माध्यमात मला रंगभूषा करायला मिळावी. प्रत्येक चेहरा वेगळा, त्याप्रमाणे त्याची रंगभूषा आणि वेशभूषा वेगळी त्यामुळे प्रत्येकाकडून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि यापुढेही मिळत राहोत, हीच माझी इच्छा आहे.