रंगरंगोटी – मी रंगभूमीचा लेक

>> मिलिंद कोचरेकर

रंगभूषा या माझ्या छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं. व्यवसायात पडल्यावरही या कलेत मी समाधानी आहे.

कलाकाराला भूमिकेशी समरस होण्यासाठी रंगभूषा ही एक अनोखी कला आहे. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही माध्यमात रंगभूषाकार त्याच्या कलेद्वारे कलाकाराचं व्यक्तिमत्त्व साकारतो.

मला दिग्दर्शन, अभिनयाची आवड होती. माझ्या महाविद्यालयीन जीवनात एकांकिका बसवणे, एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेणे अशी कामे केली आहेत. काही काळानंतर ही माझी कला मागे पडली. रंगभूमी तर मला सोडायची नव्हतीच, पण येथे वेगळं काय करता येईल, या दृष्टीने विचार करता रंगभूषेत नावीन्यपूर्ण काहीतरी करता येईल, स्वतःतलं कौशल्य जोपासता येण्याजोगी ही कला आहे असं वाटू लागलं. म्हणून मी या कलेकडे वळलो. मोहन तोंडवळीकरांची निर्मिती असलेल्या पहिल्या नाटकात मला रंगभूषा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर कलागुण, नाटय़– संपदा, लता नार्वेकरांचं चिंतामणी, बालनाटय़े अशा वेगवेगळ्या संस्थां–करिता रंगभूषाकार म्हणून काम करू लागलो.

आमच्या काळी ही कला विकसित करण्याच्या अनुषंगाने कोणी स्वतंत्र असा विचारच केला नव्हता. इतर कलांबाबत कार्यशाळा होतात. मात्र पूर्वी रंगभूषा या विषयावर कार्यशाळा झाली, असं माझ्या उमेदीच्या काळात कधी ऐकलं नव्हतं. तसेच काही साहित्यही उपलब्ध नव्हतं. मात्र आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आहे. या बळावरच मी ही कला आत्मसात केली. या जोडीला इतर रंगभूषाकारांचं निरीक्षण करत ही कला शिकू लागलो. वाचन, निरीक्षण, प्रत्यक्ष रंगभूषा यातून या कलेची माहिती मिळवण्याचा आजही प्रयत्न करत असतो.‘सही रे सही’ आणि ‘लोचा झाला रे’ या नाटकांसाठी रंगभूषा करण्याची संधी मला मिळाली. ज्या गोष्टी दिग्दर्शकाला सुचतात, त्या तो कागदावर मांडत असतो. त्याच्या कल्पनेला, रंगभूषेद्वारे कलाकाराला घडवण्याकरिता रंगभूषाकाराला वाव मिळत असतो हे या नाटकादरम्यान मला शिकायला मिळालं.
28 वर्षांहून जास्त काळ या कलेद्वारे रंगभूमीची सेवा करत आहे. या क्षेत्रात नवीन येणाऱया मुलांना हेच सांगेन की, या कलेतही खूप वाव आहे. ‘रंगभूषा’ या माझ्या छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं. व्यवसायात पडल्यावरही या कलेत मी समाधानी आहे. आज बऱयापैकी यश आणि नाव मिळवलंय. यापेक्षाही चांगली माणसं जोडली गेली, मोठय़ा कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या