
>> संदीप नगरकर
पोटासाठी धडपडताना रंगदेवतेने हात दिला आणि तिचाच कुंचला आयुष्यभरासाठी हाती धरला माझे बालपण गिरगावातील चाळीमध्ये गेले. घरची परिस्थिती बेताचीच होती. माझ्या वडिलांची कंपनी बंद पडल्यामुळे ते घरीच होते. त्यावेळी मी 14-15 वर्षांचा होतो. अशा वेळी कुटुंबाला हातभार म्हणून काहीतरी काम करायला हवे, हे मला समजत होते. पण करणार काय? या विचारात असतानाच आमच्या घरासमोर राहणारे रंगभूषाकार प्रमोद नलावडे मला शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना मदत म्हणून मला सोबत घेऊन गेले. ते ज्या चित्रीकरणाकरिता रंगभूषा करत होते ते चित्रीकरण सात दिवस चालले होते. त्या कामाचे मला दोनशे रुपये मिळाले. मला फार आनंद झाला. कारण ती माझी पहिली कमाई होती. त्याच क्षणी मी या व्यवसायात यायची खूणगाठ मनाशी पक्की केली.
गिरगाव पूर्वी गणपतीत गल्ल्यागल्ल्यांमध्ये नाच, नाटकं, वेशभूषा स्पर्धा होत असत. आमच्या वाडीतही मी या सर्वांत भाग घ्यायचो, पण माझा कल काम करण्यापेक्षा कलाकारांना नटवण्याकडे जास्त होता. त्यामुळे सर्व कार्यक्रमाची रंगभूषा माझ्याकडेच असायची. मी थोडेफार बघून शिकलो होतो. त्यामुळे मला जमेल तसे निभावून नेत असे.
मध्यमवर्गीय वस्तीत बाहेरून रंगभूषाकार आणणे परवडायचे नाही. त्यामुळे मला आजूबाजूच्या वाडय़ांमधूनही बोलावणे येऊ लागले. थोडेफार पैसे मिळत. यातूनच घरालाही हातभार लागायचा. शास्त्र्ााsक्त शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती. छोटे-छोटे काम करीत असतानाच प्रदीप दर्णे या रंगभूषाकारांची ओळख झाली. त्यांनी मला शिकवायचे ठरवले. इथूनच माझ्यातल्या कलेला खरी कलाटणी मिळाली. प्रदीपजींनी मला रंगभूषेतील बारकावे शिकवले.
आतापर्यंत जवळजवळ साठ ते सत्तर नाटकांच्या वेशभूषा मी साकारल्या आहेत. झालं एकदाचं, तू तू मी मी, नवा गडी नवे राज्य, दोन स्पेशल, गांधी हत्या आणि मी, थोडे तुझे थोडे माझे, झुंड, विच्छा माझी पुरी करा या नाटकांसाठी सध्या रंगभूषा करत आहे. मला महाराष्ट्र शासनाने दोन वेळा द्वितीय क्रमांक आणि एकदा तृतीय क्रमांकाने गौरवले आहे. रंगभूषेकरिता क्रायलॉन या नावाजलेल्या कंपनीचे रंग वापरतो. माझ्या आतापर्यंतच्या रंगभूषाकाराच्या प्रवासात मला प्रसिद्धी, समाधान मिळालं. तसेच माझ्या कौटुंबिक परिस्थिती बदलण्यास मदत मिळाली. माझी ‘भूमिका थिएटर’ ही नाटय़संस्था आहे. त्यानंतर नाटकांकरिता याच नावाने बसही घेतली आहे. आता मला निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकायचे आहे, मात्र हे सर्व मला रंगभूषाकार या व्यवसाय आणि कलेतून प्राप्त झाले आहे. जेव्हापासून ही कला मला आवडू लागली, भावली तेव्हापासूनच याच कलेत मी रमतो. कारण कलाकारांची रंगभूषा करता करता स्वतःतला आनंद शोधणे हे मला या कलेनेच शिकवले आहे.





























































