
वृक्ष संवर्धनासाठी अनेक उपाययोजना केल्याचे सांगणाऱ्या पालिकेच्या कारभारात आता मलबार हिल येथील ‘हरित श्रेत्र’ आरक्षण असलेला भूखंड थेट ‘निवासी’ भूखंड करण्याचे आरक्षण टाकण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या बुधवारी होणाऱ्या सुधार समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. मात्र आरक्षण बदलावरून या प्रस्तावावर सत्ताधारी-विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.
मुंबईच्या विकास आराखडय़ात मलबार हिल येथील कोटय़वधी रुपये किंमतीचा न.भू.क्र.869 व 935 हे भूखंड ‘बगीचा/उद्यानासाठी आरक्षित आहेत. हे आरक्षण रद्द करून हे भूखंड निवासी वापरासाठी आरक्षित करावेत, असा आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. दुसरा प्रस्ताव मलबार हिल येथीलच आहे. त्याचा न.भू.क्र.332 (भाग), 360 (भाग) हे भूखंड’ हरित पट्टा असे आरक्षण आहे. या भूखंडाचे टाकण्यात आलेले हे आरक्षण रद्द करून त्यावर निवासी वापर असे आरक्षण बदलण्यात यावे, असा प्रस्ताव सुधार समितीत मंजुरीसाठी सादर आला आहे.
असे आहे प्रकरण
मलबार हिल या एकूण 7820.29 चौ. मी. या भूभागापैकी उत्तरेकडील 3093.67 चौ. मी. इतक्या भूखंडाची मालकी मे. एव्हरेस्ट अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. यांच्या अखत्यारित आहे. तसेच, न.भू.क्र.360, मलबार हिल या एकूण 6625.47 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या ऑनलाईन मालमत्ता पत्रकानुसार सदर भूखंडाची मालकी मे. मलबार हिल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. यांच्या अखत्यारित असल्याचे दिसून येते.


























































