
मालाडच्या पूर्वेकडील नागरिकांची प्रशासकीय कामे मार्गी लावण्याबरोबरच व नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी पूर्वेला मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सुरू करण्याबाबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येईल. या ऑफिससाठी जागेचे पर्याय शोधण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला देण्यात येतील, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
मुंबई महापालिकेने पी उत्तर विभागाचे विभाजन करून पी पूर्व व पी पश्चिम अशी दोन स्वतंत्र प्रभाग कार्यालये सुरू केली. पण पी पूर्व व पी पश्चिम स्वतंत्र प्रभाग कार्यालये सुरू झालेली नाहीत. यामुळे मालाड पूर्व व पश्चिमेतील नागरिकांना पालिकेतील प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याबाबत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडली होती. वॉर्ड विभाजनासाठी निधीची तरतूद केली नसल्याने मालाड पूर्व भागातील नागरिकांना नवीन वॉर्डपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पूर्वेला नवीन वॉर्ड ऑफिस सुरू करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.























































