
नोबेल पुरस्कार विजेती आणि पाकिस्तान शिक्षण चळवळतील कार्यकर्ता मलाला युसफजाई हिने ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी प्राप्त केली आहे. मलालाने फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स विषयातील पदवी प्राप्त केली असून यासंदर्भातील माहिती तिने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
पदवी मिळाल्याचा आनंदाचा क्षण तिने ट्विटरवर शेअर करताना एक छायाचित्रदेखील पोस्ट केले आहे. यामध्ये ती आपल्या कुटुंबीयांसोबत केक कापून पदवीचा आनंद साजरा करीत आहेत. हे ट्विट करताना ती म्हणाली, ऑक्सफर्ड विद्यापीठाची फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना मला खूप आनंद होत आहे. पुढे काय करणार हे माहीत नाही. पण सध्यातरी नेटफ्लिक्स, वाचन आणि झोप हा माझा कार्यक्रम आहे.’

























































