
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. या प्रकरणातील भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपींची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरली असून आरोपींना संशयाचा फायदा मिळायलाच हवा, किंबहुना संशय पुराव्याची जागा घेऊ शकत नाही तर दोष सिद्धीसाठी ठोस पुरावेच आवश्यक असतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटरसायकलवर बॉम्बस्पह्ट घडवण्यात आला. या घटनेत 6 ठार तर 100हून अधिक जण जखमी झाले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्या विरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए), आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना यात फरार आरोपी दाखवण्यात आले आहे. अनेक साक्षीदार पुरावे तपासल्यानंतर तसेच सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज गुरुवारी न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी हा निकाल जाहीर करत सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींवर हे होते आरोप
मालेगाव बॉम्बस्पह्ट प्रकरणातील आरोपींविरोधात यूएपीए कलम 16 (दहशतवादी कृत्य करणे), 18 (दहशतवादी कृत्याचा कट रचणे), 120 (ब) (गुन्हेगारी कट), 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 324 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 153 (अ) (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) भारतीय दंड विधानाच्या अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
34 साक्षीदार फिरले
राष्ट्रीय तपास यंत्रणेने या खटल्यात 323 साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तर आरोपपत्रातील जवळपास 30 पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय 34 साक्षीदार फिरले. बॉम्बस्फोटांचा कट रचण्याबद्दल आरोपींनी केलेल्या कोणत्याही चर्चेत आपण सहभागी झाल्याचे किंवा ही चर्चा ऐकल्याचे या साक्षीदारांनी नाकारले. प्रकरणाचा सुरुवातीचा तपास करणाया राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जबरदस्तीने, बेकायदेशीररित्या आपल्याला ताब्यात घेतले आणि काही व्यक्तींची नावे सांगण्यास, खोटे विधान करण्यास धमकावल्याचा आरोपही या साक्षीदारांनी साक्ष नोंदवताना केला होता.
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखाची भरपाई
या बॉम्बस्पह्टात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून 2 लाख तर जे जखमी झाले त्यांना 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी असे आदेश न्यायाधीश ए के लाहोटी यांनी दिले. बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचे पुरावे नाहीत.
भोपाळ आणि नाशिकमध्ये स्फोटाचा कट रचण्यात आलेल्या अनेक बैठकांना आरोपी उपस्थित होते या फिर्यादी पक्षाच्या खटल्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही साक्षीदाराने या सिद्धांताचे समर्थन केलेले नाही आणि म्हणूनच बैठक किंवा कट रचला गेला हे सिद्ध होऊ शकले नाही. उजव्या विचारसरणीच्या ‘अभिनव भारत’ या गटाने पैसे वाटले होते हे दाखवणारे पुरावे असले तरी, दहशतवादी कारवायांना निधी देण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत, किंबहुना पुरोहित यांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी हे पैसे वापरले असल्याचे दिसून येते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाचे आभार – कर्नल पुरोहित
निकालानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी सांगितले की, या प्रकरणात गोवण्यापूर्वी मी ज्या निष्ठsने माझ्या देशाची व संस्थेची सेवा करत होतो त्याच निष्ठेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले.
भगव्याचा विजय झाला – साध्वी प्रज्ञासिंग
न्यायालयाने निकाल सुनावल्यानंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग या भर कोर्टात रडल्या. माझा बराच छळ करण्यात आला. मी संन्यासी जीवन जगले. आज चा निकाल म्हणजे भगवा आणि हिंदुत्वाचा विजय आहे असे त्या म्हणाल्या.
750 रुपये परत द्या – समीर कुलकर्णी
निकालानंतर समीर कुलकर्णी यांनी न्यायालयाला सांगितले की, तपास यंत्रणेने भोपाळ मधून ताब्यात घेतले तेव्हा आपल्याकडे 900 रुपये होते. मात्र कागदोपत्री 750 रुपये असल्याचे दाखवण्यात आले. प्रश्न पैशांचा नाही पण त्यावेळी माझ्या कडून घेतलेले पैसे मला परत हवे आहेत अशी मागणी त्यांनी केली मात्र कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही मौल्यवान वस्तू परत करण्याचा आदेश दिलेला नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
न्यायालयाचे निरीक्षण काय…
- बॉम्बस्फोट मोटरसायकलमध्ये झाला हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही.
- जखमींची संख्या 101 नाही तर 95 आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्येही फेरफार करण्यात आला.
- कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब तयार केला होता, त्यांनी आरडीएक्स साठवून ठेवले होते हे सिद्ध झाले नाही.
- बॉम्बस्फोट ज्या ठिकाणी झाला तेथील वैज्ञानिक पुरावे तपास यंत्रणेने जमा केले नाहीत.
- मोटरसायकलचा स्फोट झाला ती मोटरसायकल प्रज्ञा सिंह यांच्या मालकीची असल्याचे तपास यंत्रणा सिद्ध करू शकले नाहीत. मोटरसायकलचा चेसीस नंबर पुसून टाकण्यात आला, इंजिन नंबरही संशयास्पद आहे.
सुप्रीम कोर्टात दाद मागणार
मालेगाव बॉम्बस्फोटात शेख लियाकत मोईउद्दीन यांनी त्यांची मुलगी गमावली होती. माझी मुलगी वडापाव आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र तिचा ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला. आजचा विशेष न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. खूप चुकीचा निर्णय झाला आहे. हेमंत करकरे यांनी अत्यंत सखोल तपास केला होता. अनेक पुरावे देखील सादर केले होते तरी देखील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत असे त्यांनी सांगितले.
कॉँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी – देवेंद्र फडणवीस
काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रचार किती खोटा होता हे उघड झाले. काँग्रेस व यूपीएने षड्यंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता, हे कोर्टाने पुराव्यानिशी सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी ज्यांच्यावर कारवाई केली. त्यांची तसेच संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशासमोर आणखी दुसरे अनेक मुद्दे आहेत – राहुल गांधी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रसारमाध्यमांनी विचारले असता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कृपया विषयांतर करु नका अशी विनंती पत्रकारांना केली. देशासमोर आणखी दुसरे अनेक मुद्दे आहेत. देशाचे आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तुम्हाला हे मुद्दे दिसत नाहीत. तुम्णी लोकांचे दुसऱ्याच मुद्दय़ांवर लक्ष भरकटवताय, असे ते म्हणाले.
भगवा दहशतवाद म्हणू नका, सनातनी म्हणा – पृथ्वीराज चव्हाण
भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंडय़ाचा रंग आहे. तसंच वारकऱयांच्या झेंडय़ाचा रंगही भगवा आहे. त्यामुळे भगवा दहशतवाद असं कुणीही म्हणू नये. त्याऐवजी हिंदुत्ववादी किंवा सनातनी दहशतवाद म्हणा, असे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
काँग्रेसच्या लोकांनाही माझी विनंती आहे. भगवा दहशतवाद म्हणू नका, असे आवाहनही त्यांनी केले. ज्यांना सोडलं ते निर्दोष नाहीत तर पुरावे नसल्याने सुटलेत. स्फोट आपोआप झाला का? कट कुणी केला? आरडीएक्स कुणी आणलं? एनआयए अमित शहा यांच्या नेतृत्वात काम करतं आहे. त्यामुळे वेगळी काय अपेक्षा ठेवणार, असे चव्हाण म्हणाले.
आता सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई रेल्वे स्पह्टाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव बॉम्बस्पह्टाच्या निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का, हे स्पष्ट करावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्पह्ट खटल्यातील आरोपींबद्दल सौम्य भूमिका घ्यावी, असे तपास यंत्रणा एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी केलेले वक्तव्यही आजच्या निकालानंतर महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे सपकाळ म्हणाले.
आरडीएक्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित – जितेंद्र आव्हाड
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर 65 किलो आरडीएक्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे. आतंकवादाला जात, धर्म, रंग, पंथ नसतो. यात काँग्रेसचा काही संबंध नाही. मुंबईच्या लोकल बॉम्ब ब्लास्टमधले देखील आरोपी निर्दोष सुटले मग हे काय कुठल्या राजकीय पक्षांनी केले काय? असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
निकालाला हायकोर्टात आव्हान देणार
मालेगाव बॉम्बस्पह्ट प्रकरणाच्या निकाल सुनावणीनंतर पीडित कुटुंबियांच्या वतीने बाजू मांडणारे वकील अॅड. शाहीद नदीम यांनी आरोपींच्या निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ, अपील दाखल करू असे सांगितले.
दहशतवादाला धर्म नाही
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले आहे की, दहशतवादाला कोणताही धर्म नसतो यात शंका नाही, परंतु सरकारने सादर केलेल्या पुराव्यांवरून आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही. तसेच या प्रकरणात यूएपीए लादता येणार नाही, कारण नियमांनुसार तशी मंजुरी घेण्यात आली नव्हती. या प्रकरणात यूएपीएचे दोन्ही मंजुरी आदेश सदोष आहेत.